जालना (प्रतिनीधी) – दसरा, दिवाळी सारखे सन आपल्यासह प्रत्येकांच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. मात्र,नौकरी मिळाल्याने गरीब मुलांच्या चेहऱ्यावर दिसत असलेला आनंद यापेक्षा मोठा आनंद आपल्याला झाला असे भावोद्गार आ. कैलास गोरंटयाल यांनी येथे बोलतांना काढले. जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी जालना जनसेवा ग्रुप आणि आयएसआय ई इंडिया या संस्थेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरातून २१ पैकी १३ विद्यार्थ्याना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नौकरी मिळाल्याने त्यांचे कौतुक व प्रशस्तीपत्रांचे वाटप काल शुक्रवारी आ. कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या प्राचार्या श्रीमती रजनी एस. शेळके, जालना जनसेवा ग्रुपचे सचिव डॉ. रामनारायण जैस्वाल, सुदेश करवा आयएसआय ई इंडिया या संस्थेच्या झोनल मॅनेजर रुपाली अग्रवाल नरेश गुप्ता, सुनील राठी, संजय बाहेती, आयएसआय ई इंडिया या संस्थेचे प्रशिक्षक गणेश राजपूत यांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. आपल्या भाषणात आ.गोरंटयाल यांनी जालना जनसेवा ग्रुपच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची प्रशंसा करून गणपती उत्सव असो की दसरा, दिवाळी सारखे सन असो या सणांचा आनंद प्रत्येकांच्या चेहऱ्यांवर दिसून येतो. परंतु जनसेवा ग्रुप आणि आयएसआय ई इंडिया या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या प्रशिक्षणाद्वारे या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील २१ पैकी १३ विद्यार्थ्यांना राज्यातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये मिळालेल्या नोकरीमुळे आपल्याला दसरा, दिवाळी सारख्या सणांपेक्षाही मोठा आनंद झाला असल्याचे सांगून नोकरी मिळालेल्या मुलांच्या कुटुंबातील सदस्यांना किती आनंद झाला असेल याची कल्पनाच करू शकत नाही.जालना जनसेवा ग्रुपचा सदस्य म्हणून जालन्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करून आ.कैलास गोरंटयाल म्हणाले की, त्यासाठी लागणाऱ्या मदतीची काळजी करू नका, माझ्यावर सोडा सर्वोतोपरी मदत मिळवून देण्याची तयारी त्यांनी यावेळी दर्शवली. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्याने भविष्यात पेट्रोल, डिझेलचा वापर कमी होणार असून ही बाब लक्षात घेवून तरुणांना वाव मिळेल, त्यांना रोजगार मिळेल अशा पद्धतीचे ट्रेड या प्रशिक्षण संस्थेत सुरू करण्याचा आपला प्रयत्न राहील अशी ग्वाही आ.कैलास गोरंटयाल यांनी यावेळी दिली.