जालना – जालना जिल्ह्याने रेशीम अंडीपुज निर्मितीपासून ते रेशीम धागा निर्मितीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया उपलब्ध करुन देण्यासाठी ‘मलबेरी सिल्क सॉईल टू फॅब्रिक प्रोसेस अंडर वन रुफ’ हा प्रकल्प उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा ‘स्कॉच 2024 राष्ट्रीय पुरस्कार’ जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना प्रदान करण्यात आला.
स्कॉच या संस्थेकडून विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीकरीता दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात रेशीम प्रक्रिया उद्योगासाठी विविध सकारात्मक पाऊले उचलण्यात आल्याने रेशीम प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला यश आले. याच कामाची दखल घेत स्कॉच संस्थेच्यावतीने श्री. पांचाळ यांची या पुरस्कारासाठी निवड केली. स्कॉच संस्थेच्यावतीने नवी दिल्ली येथे शनिवार, 21 सप्टेंबर रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात रेशीम विकास अधिकारी श्री. मोहिते यांनी जिल्हाधिकारी श्री. पांचाळ यांच्यावतीने हा पुरस्कार स्विकारला होता. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रेशीम उपसंचालक डॉ. महेंन्द्र ढवळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना हा पुरस्कार सुपूर्द करण्यात आला.
यावेळी डॉ. पांचाळ म्हणाले की, जालना जिल्ह्यात हा रेशीम प्रकल्प यशस्वी करण्याकरीता रेशीम अधिकारी अजय मोहिते, तहसिलदार विक्रांत मुंढे, अंबडचे तत्कालीन तहसिलदार चंद्रकांत शेळके, घनसावंगी तहसिलदार श्रीमती योगिता खटावकर यांचे सहकार्य लाभले. या प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना समृध्दी प्राप्त होऊन रोजगार निर्मितीत नक्कीच वाढ होईल.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, दिपक पाटील, डॉ. दयानंद जगताप, पद्यमाकर गायकवाड यांच्यासह सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. रेशीम कोष बाजार पेठ तसेच महिको यांच्यामार्फत रेशीम अंडीपुज निर्मिती केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बीजकोषाला 1 लाख 13 हजार रुपये प्रती क्विटंल दर बीज कोष निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दूप्पटीने वाढले आहे. तसेच रेशीम धागा निर्मितीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया उपलब्ध असणारा जालना हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा ठरला आहे. जालन्याच्या रेशीम कोष बाजारपेठेत राज्यातील सर्व जिल्ह्यांतुन शेतकरी रेशीम कोष विक्री करण्याकरीता येतात. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन जालना जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड करून रेशीम उद्योगाकडे वळत आहे.