पुणे: मागील काही दिवसांमध्ये महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अशातच पुण्यात एका वृध्द महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे, या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने जबरदस्ती करत, मारहाण करत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, घरी पाहुणे आल्यामुळे सर्वजण बोलण्यात आणि गप्पा मारण्यात व्यस्त होते. 85 वर्षीय वृद्ध महिला घराबाहेर चालत होती. त्या वेळी 23 वर्षीय नराधम तरुणाने वृद्ध महिलेला फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जखमी झालेली वृद्ध महिला जिन्यात विव्हळत होती. पाहुणे गेल्यानंतर घरातील मंडळी बाहेर आली. वृद्धेची शोधाशोध सुरू झाली. त्या वेळी महिलेला आपली आई जिन्यात जखमी अवस्थेत विव्हळत पडली असल्याचे दिसले. त्यानंतर वृध्द महिलेने घडलेली घटना सांगितली. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 23) म्हाळुंगे येथे घडला आहे.
याप्रकरणी पीडित वृद्ध महिलेच्या 57 वर्षीय मुलीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपी नराधम ओम जयचंद पुरी (वय वर्षे 23, सध्या रा. साखरेवस्ती, मूळ रा. धाराशिव) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इलेक्ट्रिशन म्हणून काम करतो. घटना घडली त्या दिवशी (सोमवारी) संध्याकाळच्या सुमारास पीडित वृद्ध महिला सोसायटीतील पाचव्या मजल्यावर असलेल्या आपल्या फ्लॅट समोर चालत होती. त्याचवेळी आरोपी त्या सोसायटीमध्ये होता. पाचव्या मजल्यावर असताना त्याने वृद्ध महिलेला पाहिलं. मजल्यावर कोणीच नसल्याचं पाहून त्याने वृद्ध महिलेचं तोंड दाबलं. त्यानंतर नराधमाने वृध्द महिलेला जिन्यातून फरफटत सहाव्या व सातव्या मजल्याच्या जिन्यातील मोकळ्या जागेत नेऊन बलात्कार केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपीने बलात्कार करताना वृद्धेचा गळा दाबला. तसेच, वृद्ध महिलेला मारहाण केली. हा सर्व प्रकार तब्बल पाऊण तास सुरू होता. ही घटना घडत असताना वृद्ध महिलेने नराधमाला प्रतिकार देखील केला, यावेळी आरडा ओरडा केली होती. मात्र, तिच्या मदतीसाठी कोणीही आले नाही.
वृध्द महिलेच्या मुलीने पोलिस ठाण्यात फिर्याद देताच पोलिसांनी घटना गांभीर्यने घेत तातडीने तपास सुरू केला. चार दिवसांपूर्वी हा आरोपी सोसायटीमध्ये काम करण्यासाठी आला होता. त्यानंतर पुन्हा सोमवारी हा आरोपी पुन्हा सोसायटीत कामासाठी आला. त्यावेळी त्याने हे घृणास्पद कृत्य केलं. पोलिसांनी सोसायटीत जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्याद्वारे आरोपीची ओळख पटली. पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.