जालना – असंघटित कामगारांप्रमाणेच दुर्लक्षित घटक, वंचितासह समाजासाठी अण्णासाहेब पाटीकल यांनी सामाजिक आंदोलनाच्या लढ्यात प्राणाच्या समिधा अर्पण करून अनेक समस्या आणि प्रश्न मार्गी लावले. दुर्लक्षित आणि असंघटतांसाठी काम करणे हे संतांचे लक्षण आहे. त्यामुळे असंघटीत कामगार व वंचितासाठीचे काम देवापेक्षाही मोठे आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी केले. बुधवार दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता स्व. आण्णासाहेब पाटील चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
स्वातंत्र्यानंतर 60-70 च्या कालखंडात कामगार मोठ्या प्रमाणात असंघटित होते. तेव्हा कायदे नव्हते, त्यामुळे त्यांचं शोषण व्हायचं. आरोग्याच्याही समस्या होत्या. अशा परिस्थितीत स्व. अण्णासाहेब पाटील यांनी कामगारांचे संघटन केले आणि त्यांच्या प्रयत्नाने यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात सर्वात प्रथम असंघटित कामगारांसाठी कायदा तयार करण्यात आला. त्यामुळेच अण्णासाहेब पाटील हे 50 हजार माथाडी कामगारांच्या घरातील दैवत बनले. असेही श्री कुलकर्णी यांनी म्हटलं.
हमाल-माथाडी कामगारांचे आराध्य दैवत आणि मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त चत्रभुज पेट्रोल पंपासमोर स्व. अण्णासाहेब पाटील चौकात आदरांजली सभा आयोजित केली होती. यावेळी जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, माजी नगराध्यक्ष राजेश राऊत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, कोषाध्यक्ष अशोक पडूळ, दिनकर घेवंदे, किशोर गरदास, माजी नगरसेविका सौ. संध्याताई देठे, ओबीसी संघटनेचे आनंद लोखंडे, हिंदू महासभेचे धनसिंह सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. यावेळी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे लिखित पुढचं पाऊल या पुस्तकाचे प्रमोशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील सामाजिक आंदोलनात अनेक थोर पुरुषांची परंपरा राहिलेली असून, या परंपरेतील एक पुष्प म्हणजे अण्णासाहेब पाटील हे होते. समाज लढ्यातील यज्ञकुंडात प्राणाची समिधा अर्पण करून त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून अरविंद देशमुख, अशोक पडूळ आणि त्यांचे सहकारी वाटचाल करत असल्याचे सांगून त्यांनी अण्णासाहेबांना आदरांजली अर्पण केली.
महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर म्हणाले की, हमाल, माथाडयांचे आराध्य दैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा उभारण्यात यावा, ही कित्येक वर्षापासूनची मागणी आहे. आता त्यासाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. प्रशासन अनुकूल आहे. प्रशासनालाही काही मर्यादा असतात. नियम पाळावे लागतात. त्यामुळे अमुक ठिकाणीच पुतळा उभारण्यात यावा, असा आग्रह असता कामा नये. सर्वप्रथम पुतळा समितीची नोंदणी, समितीमार्फत जागेची मागणी, जागा निश्चिती, त्या परिसरातील विविध विभागाचे ना हरकत आदी प्रक्रिया महिनाभरात महापालिकेच्यावतीने शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन देऊन माझ्या कार्यकाळात पुतळा उभारणी होईलच, यासाठी प्रयत्नशील राहू, असे ते म्हणाले. सामाजिक चळवळीसाठी एक संवेदनशील अधिकारी म्हणून आपले मराठा महासंघाला सर्वतोपरी सहकार्य राहील, असे ते म्हणाले.
यावेळी राजेश राऊत यांनी अण्णासाहेब पाटील यांचा प्रलंबित पुतळा उभारणीचा प्रश्न आणि विविध मुद्द्यांकडे संतोष खांडेकर यांचे लक्ष वेधले. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, धनसिंह सूर्यवंशी, दिनकर घेवंदे यांचीही समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ड. शैलेश देशमुख यांनी केले. प्रास्ताविक अशोक पडूळ यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार प्रा.संतोष कर्हाळे यांनी मानले. कार्यक्रमाला सुभाष चव्हाण, मंगेश मोरे, रोहित नलावडे, संतोष जाधव, कैलास देठे, गणेश गायकवाड, रवीकुमार सूर्यवंशी, शक्तीसिंग राजपूत, कपिल चौधरी, आकाश जगताप, शुभम टेकाळे, बबन शेजुळ, बाळासाहेब देशमुख, श्रीधर पोथरे, सुरेश गंगाधरे, कैलास सरकटे, दीपक आगलावे, उमेश कुटे, दादा गाडे, सुशील चित्राल, शेख गफार, योगेश पाटील, योगेश गरड, किरण देशमुख, बबनराव गवारे, मंगेश चव्हाण, मंगेश देशमुख, सचिन पठाडे योगेश सोळुंके यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.