जालना : ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील गरीब कुटुंबांना पक्के घर देण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारच्या घरकुल योजना राबविण्यात येतात. दलित कुटुंबासाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास आणि ओबीसी प्रवर्गातील गरीब कुटुंबासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील सुमारे 3000 गरीब कुटुंबांना घरकुल मंजूर करून देण्यात भाजप नेते सतीश घाटगे यांना यश आले आहे. दोन्ही योजनेतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्यावतीने घरकुल मंजूर झाल्याचे पत्र देण्यात आले आहे.
अनेक वर्षापासून घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील दलित कुटुंब तसेच ओबीसी प्रवर्गातील अनेक गरीब कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित होते. या खऱ्या गरजू आणि गरीब कुटुंबांना हक्काचे घरकुल मिळवून देण्यासाठी सतीश घाटगे यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करून त्यांचा शासनाकडे पालकमंत्री अतुल सावे यांच्यामार्फत पाठपुरावा केला. अतुल सावे यांच्या सहकार्यातून व सतीश घाटगे पाटील यांच्या प्रयत्नामुळे घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील 3000 गरीब कुटुंबांना रमाई आवास व यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे. घरकुल मंजुर झालेल्या लाभार्थींना आनंद व्यक्त करत सतीश घाटगे व सरकारचे आभार मानले.
सरकारचे आणि प्रशासनामुळे हे शक्य झाले –
प्रत्येक गरिबाला पक्के घर देण्याचे ध्येय सरकारचे आहे. म्हणून गरीब कुटुंबासाठी निधीची तरतूद करून सर्वाना घरे देण्यासाठी घरकुल योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. खऱ्या गरीब कुटुंबाला घरकुल मंजूर करून देता आले याचे समाधान आहे. सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांचे मी लाभार्थीच्या वतीने आभार मानतो.