जालना शहरात मागील काही दिवसापुर्वी लिफ्ट मागून लुटणार्या टोळीवर पोलीसांनी कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा या टोळीने सावज शोधायला सुरुवात केली असून दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी भाकरदन नाका येथील शिंदे हॉस्पीलटल समोर कार चालकास लिफ्ट मागून लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गुरुवार दि. 26 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजता पोलीस सुत्रांनी दिली.
या प्रकरणी प्रवीण पांडुरंग खार्डे रा. गोंदेगाव ता. जि. जालना यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की, त्यांचे जालना शहरातील शिवाजी महाराज पुतळा चौकात बालाजी स्विटमार्टचे दुकान आहे. ते दि.24 सप्टेंबर रोजी बस स्टँड परिसरात लाकडाच्या उधारीचे पैसे देण्यासाठी गेले होते. त्यानंतर परत येत असतांना शिंदे हॉस्पीटल समोर एका महिलेने मुलाची तब्येत खराब असल्याचे भासवून कारमध्ये लिफ्ट मागीतली. मुलाच्या आजारपणामुळे त्यांनी महिलेला लिफ्ट दिली. कार जालना शहराकडून राजुरकडे जात असतांना एका कार चालकाने त्यांची कार आडवली आणि महिलेला कुठे घेऊन जातो असे सांगून त्याला मारहाण केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी देत त्याच्या जवळचे 12 हजार 500 रुपये हिसकावून घेतले. तसेच प्रकरण मिटवायचे असेल तर 2 लाख रुपये देण्याची मागणी केली. परंतु, कार चालक त्यांच्या तावडीतून सुटून गेला. त्या घटनेनंतर दुसर्या दिवशी महिला दुकानावर गेली आणि पैशाची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून लुटमार करणार्या दोन महिला आणि दोन पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.