जालना (प्रतिनीधी) मागील पंधरा वर्षापूर्वी जालना येथे मुलींसाठी मंजूर करण्यात आलेली औद्योगिक प्रशिक्षण संस्था अपेक्षित असलेल्या पदे आणि यंत्रसामुग्रीसह तात्काळ सुरू करावी अशी आग्रही मागणी आ. कैलास गोरंटयाल यांनी राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेऊन केली. दरम्यान, या बाबत सकारात्मक प्रतिसाद देत सदर संस्था कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्यपालांनी यावेळी दिली.
जालना येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. जालना येथील जिल्हा प्रशासकीय इमारतीमधील महसूल भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर जालन्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि. २६ जुन २००९ रोजी काढलेल्या एका शासन निर्णयाद्वारे राज्यातील महिलांसाठी २० नविन औद्योगीक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यास तत्वतः मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये जालना येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचा देखील समावेश आहे. मात्र, शासन निर्णय निघून आता तब्बल १५ वर्षांचा कालावधी उलटूनही जालना येथील महिलांसाठीची औद्योगीक प्रशिक्षण संस्था सुरु झालेली नाही ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे आ. गोरंटयाल यांनी या निवेदनात म्हटले आहे. सदर प्रशिक्षण संस्थेला मंजुरी दिल्यानंतर प्रशिक्षणासाठी लागणारी तांत्रिक पद भरती, लिपीकवर्गीय पदभरती तसेच त्यांना शिकविण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री व साधन सामुग्री या बाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने अद्याप महिलांसाठीची औद्योगीक प्रशिक्षण संस्था सुरू झाली नसल्याचे निदर्शनास आणून देत जालना हे औद्यागीक शहर असून ३ फेज मध्ये औद्योगीक क्षेत्र कार्यान्वीत आहे. स्टील उद्योगासह इतर छोटे मोठे उद्योग चालू आहेत. त्यांना कुशल कामगारांची आवश्यकता असून जालन्या सारख्या अविकसीत भागात महिलांसाठीचे प्रशिक्षण सुरू झाल्यास उद्योगांना प्रशिक्षीत कुशल कामगार मिळतील, महिलांना सुध्दा रोजगार मिळेल याकडे आ. कैलास गोरंटयाल यांनी राज्यपालांचे लक्ष वेधून आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालून १५ वर्षापुर्वी मंजुर असलेली महिला औद्योगीक प्रशिक्षण संस्था तात्काळ सुरू करावी अशी मागणी आ. गोरंटयाल यांनी राज्यपालांना दिलेल्या या निवेदनात केली आहे. यावेळी आ. राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची उपस्थिती होती.