घनसावंगी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घनसावंगी विधानसभेतील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा शुक्रवारी संवाद मेळावा झाला. या मेळाव्यास घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावून घनसावंगी विधानसभेची जागा भाजपला सोडून सतीश घाटगे यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी पक्षांच्या नेत्याकडे केली. सतीश घाटगे यांनीही आपली भूमिका या मेळाव्यात जाहीर करत घनसावंगीची जागा सोडणार नाही, वेळप्रसंगी जनतेसाठी मैदानात उतरणार, अशा शब्दात निवडणूक लढविण्याचे संकेत दिले.
या मेळाव्यास भारतीय जनता पार्टीची जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदर्गे, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, पक्ष निरीक्षक गौतम गोलच्छा, विजय कामड , भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजीराव बोबडे, डॉ. रमेश तारगे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शिवाजीराव कंटुले , राहुल पाटील कणके, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे, रामेश्वर माने , पुरुषोत्तम उढाण , पांडुरंग भांगे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घनसावंगी शहरातील तहसील रोड शेजारी हा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यास अंबड, जालना आणि घनसावंगी तालुक्यातील हजारो भाजप कार्यकर्ते व गावागावातून सतीश घाटगे यांच्या समर्थक मोठ्या संख्येने आले होते. या मेळाव्यात भाजप कार्यकर्ते पदाधिकारी व सतीश घाटगे यांच्या समर्थकांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सतीश घाटगे यांनाच उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी पक्षाच्या नेत्याकडे व पक्ष निरीक्षकांकडे केली. तसेच सतीश घाटगे विधानसभा निवडणुकीत जी भूमिका घेतील त्या भूमिकेसोबत कार्यकर्ते व पदाधिकारी जातील, असेही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांनीही घनसावंगीची जागा भाजपला सुटावी अशीच मागणी पक्ष श्रेष्ठीकडे केल्याचे सांगितले. पक्ष निरीक्षक गौतम गोलेच्छा यांनी सतीश घाटगे यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच घनसावंगी विधानसभेत भाजपसाठी वातावरण पोषक असल्याचे सांगत पक्ष श्रेष्ठीकडे घनसावंगी विधानसभेची जागा सोडण्यासाठी शिफारस करणार असल्याचे सांगितलं.
गेल्या अनेक वर्षापासून महायुतीमधील पक्षाच्या उमेदवारासाठी काम करत आला आहे. परंतु त्यांना यश आले नाही. आता भाजप मतदारसंघात मजबूत झाला असून आगामी निवडणूक जिंकू शकतो. त्यामुळे ही जागा भाजपलाच सुटली पाहिजे. जनभावनेचा आदर न झाल्यास सतीश घाटगे यांच्या पाठीमागे उभा राहण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात केला.