जालना शहरातील नुतन वसाहत येथील विसावा शाळेजवळ असलेल्या जलकुंभात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. रविवार दि. 13 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8 ते 9 वाजेच्या सुमारास नळाला आलेल्या पाण्यात दुर्गंधी येत असल्याने तसेच पाण्यात आळ्या दिसून आल्याने नागरीकांना संशय आला होता. त्यामुळे तर्क वितरर्क लावण्यात येत होते. त्यामुळे काही नागरीकांनी पोलीसांच्या मदतीने पाण्याच्या टाकीवर जावून पाहिले असता त्यात एक पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे यांनी पोलीस पथकासह घटनस्थळी धाव घेतली.
दरम्यान, या जलकुंभात त्याच भागात राहणार्या अनिल काकडे या इसमाचा मृतदेह असल्याची माहिती समोर आली. 4 ते 5 दिवसापासून हा इसम मिसींग असल्याची माहिती स्थानिक नागरीकांनी दिली. पोलीसांनी अग्निशामक विभागाचे जवान आणि काही नागरीकांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढला असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आलंय. सदरील इसमाने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.