अगदी चित्रपटातील प्रसंगाप्रमाणेच जालना जिल्ह्यातील समृध्दी महामार्गावर चोर पोलीसांचा खेळ पहायला मिळाला. डिझेल चोरण्याचा प्रयत्न करणार्या चोरट्यांनी पोलीसांना पाहुन धुम ठोकली, अखेर पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन चोरट्यांना गाठलेच. परंतु, गाडी उभा करुन चोरटे अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले, चोट्यांची स्विफ्ट डिझायर कार आणि चोरीसाठीचे इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. ही घटना शुक्रवार दि. 26 ऑक्टोबर 2024 मध्यरात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास घडली.
महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उप निरीक्षक आर. के. निकम आणि त्यांचे सहकारी हे रात्र गस्तीवर असतांना समृध्दी महामार्गावर एका ट्रक जवळ स्विफ्ट डिझायर कार क्र. एम. एच. 20 बीवाय 5633 ही दिसून आली. त्यामुळे पोलीसांनी कार जवळ जाण्याचा प्रयत्न केला. परंतुख पोलीसांना पाहुन कार चालकाने कारसह धुम ठोकली, त्यामुळे पोलीसांना संशय आला आणि त्या कारचा पाठलाग सुरु केला. चोरट्यांनी त्यांची गाडी सिंदखेडराजाच्या दिशेने पळविली. त्यामुळे पोलीस उप निरीक्षक निकम यांनी दुसरबीड येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उप निरीक्षक उजैनकर यांना माहिती दिली. परंतु, चोरट्यांनी पोलीसांची दिशाभुल करुन सिंदखेडाराजा येथील टोल पासून इमर्जन्सी गेटणे कट मारला आणि पुन्हा ते जालन्याच्या दिशेने पळू लागले. त्यामुळे निकम यांनी पुन्हा चंदनझीरा पोलीसांना माहिती देऊन जालना एक्झीट पॉइंट आणि मुंबईकडे जाणार्या मार्गावर थांबण्यास सांगीलं. जालना एन्ट्रीं पॉईट जवळ येताच समोर पोलीस असल्याचे पाहुन चोरट्यांनी गाडीला ब्रेक मारला, पोलीसांनीही त्यांच्या गाडीला ब्रेक मारला, परंतु, चोरट्यांनी गाडी रिव्हर्स घेऊन पुन्हा राँग साईटने नागपुरच्या दिशेने धुम ठोकली. पोलीसांनीही त्यांचा पाठलाग सुरुच ठेवला. चोरटे राँग साईटने गाडी पळवत होते, तर पोलीस मात्र राईट साईटने त्यांचा पाठलाग करीत होते.
अखेर गुंडेवाडी पेट्रोल पंपा जवळून इमर्जन्सी गेटने नागपूरच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करीत असलेल्या चोरट्यांना समृध्दी महामार्ग चॅनल क्र. 354 जवळ गाडी आडवी लागवून आडविलं. गाडी थांबवून पोलीसांनी कार कडे धाव घेतली असता चोरट्यांनी गाडीतून उतरुन बॅरिगेट वरून उड्या मारल्या आणि अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून गेले. पोलीसांनी स्विफ्ट डिझायर कारची तपासणी केली असता गाडीमध्ये 35 लिटरच्या 4 रिकाम्या कॅन, लोखंडी रोड, स्क्रू ड्रायव्हर, पान्हे आदी साहित्य मिळून आले. कॅनमधून डिझेलचा वास येत असल्याने पळून गेलेले चोरटे हे डिझेल चोरीचासाठीच समृध्दी महामार्गाव्र फिरत असल्याचं पोलीसांनी सांगीतलं. सदरील स्विफ्ट डिझायर गाडीचे पाठीमागील दोन्ही टायर पंचर झाल्याने सदरील गाडी ही समृद्धी महामार्ग ऍडमिन बिल्डिंग येथे लावण्यात आली. या प्रकरणी पुढील कारवाईसाठी तालुका जालना पोलीसांकडे सोपविण्यात आंलय.
महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक आर. के. निकम, पोलीस नाईक जगधने, पोलीस काँस्टेबल गवई, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुशील घागरे, सुनील राठोड यांनी ही कारवाई केली.