कंपनीत काम करणारे कर्मचारी सहल आटोपून गोव्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या खाजगी बसला मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. कांडगाव जवळील तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, 30 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर कोल्हापूरमधील सीपीआर (CPR) आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हे सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गोव्याला सहलीचे आयोजन केले होते. ही सहल आटोपून सर्व जण खाजगी बसने छत्रपती संभाजीनगरकडे परतत होते. मात्र, मध्यरात्री कांडगावजवळच्या वळणावर बसचा तोल गेला आणि ती पलटी झाली. प्रवाशांना सुटका करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवांची तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल आणि खासगी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.
मृत आणि जखमी प्रवासी हे सर्व छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासानुसार, तीव्र वळण आणि वेगामुळे बसचा तोल सुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, चालक झोपेत होता का? बसमध्ये कोणतीही यांत्रिक बिघाड होती का? याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी, ग्रामस्थांनी मोठी मदत करत हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. अपघातग्रस्त बस हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे कामही प्रशासनाकडून सुरू आहे.




















