परभणी-पाथरी महामार्गावरील राहुल जिनिंगसमोर अत्यंत भीषण अपघाताची घटना घडलीय. परभणीहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील चारही तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. या दुर्घटनेमुळे मानवत शहरावर शोककळा पसरली आहे.
परभणीहून पुण्याकडे जाणारी ट्रॅव्हल्स (क्रमांक NL 01 B 1374)आणि मानवतच्या राहुल जिनिंगसमोर समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्रमांक MH 22 BB 4724) ट्रॅव्हल्सने समोरासमोर जोर दार धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झालाय. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात दुचाकीवरील चारही तरुण जागीच ठार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांची नावे शुभम आप्पाराव दहे (वय 30), विष्णू गोरे (वय 28), प्रल्हाद अशोकराव कुटे (वय 29) आणि नवनाथ शामराव जाधव (वय 38, सर्व रा. मानवत) अशी आहेत. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, मृतदेहांची अवस्था अत्यंत विदारक झाली होती. त्यामध्ये एका मृताची ओळख पटविणे सुरुवातीला पोलिसांसाठी आणि नागरिकांसाठीही कठीण झाले होते. घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, प्रमोद देवकते, शीतल बोर्डे तसेच अन्य पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह रुग्णालयात हलवले तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दरम्यान, या प्रकरणी मानवत पोलीस पुढील तपास करत आहेत. एकाच वेळी मानवत येथील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.




















