जालना-मंठा महामार्गावरील पीरकल्याण फाट्या परिसरात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पिरकल्याण प्रकल्प येथील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवार दि. 12 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्ती हा घराकडे दुचाकीवरून जात असताना भरधाव फॉर्च्युनर वाहनाने दिलेल्या जबर धडकेत हा दुर्घटनाग्रस्त मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग गायकवाड हे दुचाकीवरून पीरकल्याण फाटा ओलांडत गावाच्या दिशेने जात होते. त्याच वेळी अतिवेगात येणार्या चारचाकी फॉर्च्युनर वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की गायकवाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर चारचाकी वाहनातील चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून ते वाहन करमाड परिसरातून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास जालना पोलीस करत आहेत. या अपघातामुळे पिरकल्याण प्रकल्प परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




















