राज्यात सेक्सटॉर्शनच्या नावाखाली फसवणूक किंवा खंडणी गोळा करण्याचा प्रकार वाढला असून, या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात सेक्सटॉर्शनच्या सुमारे २२९ प्रकरणांची नोंद झाली आहे. तसेच २००२ लेखी तक्रारी पोलिसांच्या ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त झाल्या आहेत. अशा फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी एकूण १७२ जणांना अटक केली आहे. बहुतेक आरोपी हे परराज्यातील आहेत. सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात वाढ होऊ लागल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पीडित व्यक्तींना आता मदतीचा हात देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सेक्सटॉर्शन खंडणीचा फोन आल्यास घाबरून जाऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. तसेच पोलिस सेक्सटॉर्शन पीडितांचे समुपदेशनही करणार आहेत.
सेक्सटॉर्शनच्या या प्रकाराला तरुणच नाही तर वयस्कर व्यक्तीही सध्या बळी पडत आहेत. लैंगिक आकर्षणामुळे सेक्सटॉर्शनसारख्या गुन्ह्यात अडकणाऱ्या तरुणांची संख्या ही सगळ्यात जास्त असून यात १९ ते २७ वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. कामाचा ताण, एकटेपणा आणि सोशल मीडियावरून होणारी घुसमट यातून मार्ग काढण्यासाठी अनेक तरुण अशा प्रकारच्या जाळ्यात आपसूक ओढले जातात. तसेच, लैंगिक आकर्षणामुळे मुलींसोबत सेक्स चॅट करतात. अशा तरुणांना सायबर गुन्हेगार हेरून त्यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढतात. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असल्याचे अनेक गुन्ह्यांत आढळून आले आहे. सेक्सटॉर्शनला बळी पडलेले अनेक जण बदनामीच्या भीतीने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात नसल्यामुळे सेक्सटॉर्शनचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्याचेही आढळून आले आहे. सेक्सटॉर्शनच्या प्रकारात सायबर गुन्हेगार बनावट प्रोफाइल तयार करतात. समाजमाध्यमांवर अनोळखी महिला ‘हाय, हॅलो’ मैत्रीची सुरुवात करते. संदेशाला प्रतिसाद मिळाल्यास मोबाइल क्रमांकाची मागणी केली
जाते. आधी अश्लील संभाषण आणि नंतर अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल केला जातो. समोरच्या व्यक्तीलाही असे करण्यास प्रवृत्त केले जाते. हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला जातो. हा रेकॉर्ड झालेला व्हिडिओ कॉल व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितांना धमकावून पैसे उकळले जातात. काहीजण इभ्रतीचा प्रश्न म्हणून खंडणीची रक्कम देतात, तर काही जणांकडून खंडणी मागणारा फोन क्रमांक ब्लॉक केला जातो. सायबरचोरांनी काही दिवसांपूर्वीच एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अज्ञात महिलेच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल करून अश्लील चॅट केले होते. तसेच, रेकॉर्डिंग केलेला व्हिडीओ पाठवून हे अश्लील व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिली. यासाठी त्याच्याकडून एकूण १ लाख २७ हजार रुपये उकळले होते. सेक्सटॉर्शनच्या नावाखाली मागण्यात येणा-या खंडणीमुळे अनेकजण उद्ध्वस्त होत आहेत. ब-याचदा सेक्सटॉर्शनची धमकी गांभीर्याने घेणा-या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. अशा व्यक्ती सातत्याने तणावाखाली असतात. सार्वजनिक कार्यक्रमांना
उपस्थित राहणे टाळतात आणि एकलकोंडे होतात. यातून काहीजण आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात. दोन महिन्यांपूर्वी पुण्यातील एका बातमीने खळबळ उडाली होती. शहरातील दोन तरुणांना त्यांचे नग्न छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्याला घाबरून या दोन्ही तरुणांनी आत्महत्या केली होती. या दोन तरुणांना सातत्याने धमकावले जात होते. त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. बदनामीच्या भीतीने त्यांना ब्लॅकमेलिंग होत राहिले, मात्र वसुलीची मागणी पूर्ण करणे कठीण झाल्याने अखेर दोन्ही तरुणांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. प्रत्येकाला आपले वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्य नीट सांभाळता आले पाहिजे. मात्र सध्याच्या पिढीला हे सांभाळता येत नाही. अनेकांचा ‘स्क्रीन टाइम’ हा १६ तासांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे कुटुंबात आणि मित्र परिवारात गप्पा होत नाहीत. संवादाचा अभाव असल्याने एखादी अशा प्रकारची घटना घडली, आणि ती कोणाला सांगितली तर त्यावर कोण कशी प्रतिक्रिया देईल, याची भीती असते. त्यामुळे संवाद वाढवला तरच अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यातून अथवा इतर गुन्ह्यांच्या माध्यमातून जाणारा जीव वाचू शकेल. त्याचप्रमाणे काळानुसार शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे तसेच मोबाइल कसा हाताळायचा, याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे वयात येताना या मुलांना गुन्ह्यांची माहिती मिळेल आणि मुले अत्यंत हुशारीने मोबाइल वापरतील. सेक्सटॉर्शनच्या या वाढत्या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता थेट सायबर विभागाचे पोलिस सरसावले आहेत. त्यामुळे आता सेक्सटॉर्शन पीडितांना घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. तरुण-तरुणींनी व नागरिकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरताना तसेच सोशल मीडिया हाताळताना दक्षता घेऊन तसेच ऑनलाइन ऍप्लिकेशन्स वापराचे पूर्णपणे ज्ञान आत्मसात करूनच त्याचा वापर करावा. ऑनलाइन असताना संभाव्य धोका समजून घ्या आणि सुरक्षित राहा. समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करताना सावधगिरी बाळगा.
अनोळखी व्यक्तींसोबत कधीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका. तुमचे खासगी फोटो कुणालाही शेअर करू नका. अनोळखी व्यक्तीने केलेले ‘व्हिडीओ कॉल’ स्वीकारू नका. एखादा ‘न्यूड कॉल’ चुकून स्वीकारला गेला तर अधिक काळ बोलू नका. बदनामीची भीती दाखवून पैशाची मागणी केल्यास आर्थिक व्यवहार करू नका. सेक्सटॉर्शनच्या खंडणीला बळी पडल्यास तात्काळ योग्य ती खबरदारी घ्यावी. त्यात पीडितांनी घाबरून जाऊ नये आणि फसवणूक करणा-यांशी त्वरित संवाद थांबवावा. ब्लॅकमेल आणि धमक्यांचे पुरावे जतन करा. एवढेच नव्हे, तर सेक्सटॉर्शनला बळी पडले असल्याची बाब जवळच्या पोलिस ठाण्यात तात्काळ कळवावी. सेक्सटॉर्शनसारख्या प्रकरणाला धैर्याने सामोरे जा, घाबरू नका. कुटुंब आणि मित्रांना घटनेची माहिती द्या आणि त्यांना विश्वासात घ्या, जागरुक करा, असा सल्ला देण्यात आला आहे.
– सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क – ९४०३६५०७२२