देशातील एक टक्का श्रीमंतांकडे देशाची 40 टक्के संपत्ती आहे.यामुळेच देशात अनेक समस्यांचा अंबार उभा असल्याचे आपल्याला दिसुन येते. भारतातील एक टक्का श्रीमंत व्यक्तींकडे देशातील एकूण संपत्तीपैकी 40 टक्के संपत्ती आहे.तर तळागाळातील निम्म्या लोकसंख्येकडे एकूण संपत्तीपैकी फक्त तीन टक्केच संपत्ती असल्याचे ऑक्सफामच्या अहवालातून समोर आले आहे.यामुळेच भारतात आपल्याला आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि यामुळेच गरीब हा गरीबीच्या खाईत मरत आहे तर श्रीमंत हा दिवसेंदिवस श्रीमंत होतांना दिसतो.ही बाब ऑक्सफामच्या अहवालातून स्पष्ट होते. ही माहिती ऑक्सफाम आंतरराष्ट्रीय संस्थेने दिनांक 16 जानेवारी 2023 ला आपल्या अहवालात सादर केली आहे.
भारतातील 50 टक्के लोकसंख्येकडे एकूण संपत्तीच्या केवळ 3 टक्के वाटा उरल्याचेही ऑक्सफामने उजेडात आणले आहे. यामुळे देशातील गरीब व सर्वसामान्य दृष्टचक्रात अडकले आहेत.त्यामुळेच श्रीमंत लोकांचे अस्तित्व निश्चित होत आहे.कारण गरिब व सर्वसामान्य वर्ग अधिक कर भरत असुन, श्रीमंतांच्या तुलनेत आवश्यक वस्तू व सेवांवर अधिक खर्च करीत आहे.तरीही गरीब वर्ग हा गरीबीच्या खाईत गुदमरत आहे.या उलट श्रीमंत वर्ग दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे.सर्वसामान्य, गरिब, वंचित, आदिवासी,दलित, असंघटित क्षेत्रातील श्रमिक हा वर्ग कराच्या माध्यमातून सरकारची तिजोरी भरत असतो.परंतु देशातील एक टक्का श्रीमंतांनी देशाची 40 टक्के संपत्ती एकवटल्यानेच देशात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.”सव्ह्रायव्हल ऑफ रिचेस्ट” नावाचा अहवाल “ऑक्सफाम इंटरनॅशनल” या संघटनेने प्रसिद्ध केला.यात हेही म्हटले आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोसमध्ये होत असलेल्या वार्षिक बैठकीच्या पाश्र्वभूमीवर हा अहवाल सादर करण्यात आला आहे.त्यामध्ये देशातील एक टक्का श्रीमंत व्यक्तींकडे 40 टक्के संपत्ती असल्याचे म्हटले आहेच.
याशिवाय भारतातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींकडे देशातील 5 टक्के संपत्ती असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.देशातील पहिल्या 100 अब्जाधीशांवर अडीच टक्के किंवा पाच टक्के कर आकारल्यास त्या रकमेतून देशातील महागाई, शिक्षण, गरीबी कमी करणे व इतर कामे शक्य होऊ शकते.देशात अब्जाधीशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने गरीब व सर्वसामान्य वर्ग गुदमरत आहे.भारतातील अब्जाधीशांची संख्या 2020 मध्ये 102 वरून 2022 मध्ये 166 पर्यंत वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. म्हणजेच देशात दिवसेंदिवस अब्जाधीशांची व धनकुबेरांची संख्या वाढत आहे यामुळेच भारताला अनेक कठीणाईचा सामना करावा लागतो आहे. अहवालात हेही म्हटले आहे की अब्जाधीश गौतम अदानी यांच्या 2017 ते 2021 या कालावधीतील कराच्या रकमेतून सुमारे 1 लाख 79 हजार कोटी उभे राहू शकतात.त्यातुन अनेक कामे होवू शकतात. भारतातील अब्जाधीशांच्या संपूर्ण संपत्तीवर एकदाच 2 टक्के कर आकारला तर देशात 40 हजार 423 कोटी रुपये उभे रहातील.त्यातुन आपल्याला अनेक अति आवश्यक कामे करता येवू शकते.त्यामुळे देशातील विषमता दूर होण्यास मोठी मदत होईल.सरकारने देशाच्या उन्नतीसाठी व गरीबांच्या उत्थानासाठी अब्जाधीशांवर दोन ते पाच टक्के कर लावणे अत्यंत गरजेचे आहे.यामुळे सरकारच्या तिजोरीत करोडो रुपये येतील व देशातील गरीबीची खाई कमी होण्यास मोठी मदत होईल हे कार्य देशातील धनकुबेरच करू शकतात.त्यामुळे श्रीमंतांनी आपल्या जवळ असलेल्या संपत्तीवर 2 ते 5 टक्के कर सरकारी तिजोरीत जमा केला पाहिजे असे ऑक्सफामच्या अहवालात म्हटले आहे आणि मलाही वाटते देशातील धनकुबेरामुळे देश अवश्य सुजलाम सुफलाम होईल यात दुमत नाही. भारत हा 130 कोटी लोकसंख्येचा देश आहे.त्यामुळे मुठभर श्रीमंतांकडे देशाची 40 टक्के संपत्ती असने लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून चिंतेचा विषय आहे.यामुळे देशाच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो.गरीब व सर्वसामान्य वर्ग हा इमानदारीने संपूर्ण टॅक्स भरत असतो.परंतु श्रीमंत वर्ग खरोखरच संपूर्ण टॅक्स भरतात काय याचाही विचार सरकारने करणे गरजेचे आहे.जगातील एक टक्का श्रीमंत व्यक्तींनी गेल्या दोन वर्षांत जगातील इतर लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास दुप्पट संपत्ती मिळविली आहे.जगातील अब्जाधीशांची संपत्ती दररोज 2.7 अब्ज डॉलरने वाढत आहे.म्हणजेच जगातील सर्वात श्रीमंत 1 टक्का धनकुबेरांनी नव्याने निर्माण झालेल्या संपत्तीपैकी निम्मी संपत्ती हस्तगत केल्याचे ऑक्सफामने म्हटले आहे.
रमेश कृष्णराव लांजेवार.
मो.नं.9921690779, नागपूर