मुलीच्या समृध्द भविष्यासाठी सुकन्या समृध्दी योजना ही अत्यंत फायद्याची भारतीय डाक विभागाकडून चालविण्यात येणारी योजना आहे. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद विभागामधील सर्व डाक कार्यालयामध्ये सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडण्यासाठी दि. 9 व 10 फेब्रुवारी 2023 या दोन दिवसीय विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद विभागातील नागरिकांनी आपल्या प्रगतीस हातभार लावण्यासाठी तसेच आपल्या मुलीचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या सुकन्या समृध्दी योजनेत गुंतवणूक करुन भविष्यात सुरक्षित असा लाभ प्राप्त करणे फायद्याचे ठरणार आहे.
सुकन्या समृध्दी योजना मुलींचे शिक्षण व उज्ज्वल भवितव्यासाठी कशी महत्वाची असेल याबाबत डाक कर्मचारी ग्रामपंचायत, अंगणवाडी व बाल विकास प्रकल्प अधिकारी या विविध घटकांमध्ये योजनेबाबत प्रबोधन करुन दि.9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद विभागातील संबंधित डाक कार्यालयामध्ये सुकन्या समृध्दी योजनेची खाती उघडणार आहेत. सर्व डाकघरे आणि शाखा डाकघरे हे जनतेला सेवा देण्यासाठी सदैव अग्रेसर आहेत.
आवश्यक कागदपत्रे :
सुकन्या समृध्दी योजनेत सहभागासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र, मुलीचे व पालकांचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड आणि मुलीचे व पालकांचे प्रत्येकी दोन छायाचित्रे व रहिवासी पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे महत्वाची आहेत.
मिळणारे लाभ
सुकन्या समृध्दी योजनेतील गुंतवणुकीवर 1 जानेवारी 2023 पासून 7.6 टक्के आकर्षक व्याजदर लागू झालेला आहे. मुलीचे वय 10 वर्षापर्यंत असावे. मुलीच्या पालकांना केवळ 250 रुपये भरुन खाते उघडता येते तसेच पुढील जमा रक्कम 50 च्या पटीत करता येते. खाते उघडल्यापासून पुढील 15 वर्षापर्यंत खात्यात दरमहा बचत करावी लागते. यात कमीत कमी 250 व जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपये एका आर्थिक वर्षात भरणा करता येतो. 1 जानेवारी 2023 पासून 7.6 टक्के वार्षिक व्याजदर देय आहे. खात्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खात्यातील रक्कम व्याजासहित काढुन ते खाते बंद करता येते. तसेच प्राप्तीकरात कलम 80-सी नूसार सुट देय आहे. मुलीचे वय 18 वर्ष किंवा त्यापुढे असल्यास 50 टक्के पर्यंत रक्कम काढता येते.
सुकन्या समृध्दी योजनेत आपणास वर्षातून कितीही वेळा रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या योजनेतील पैसे मुलीच्या शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी काढता सुध्दा येतात. एकदा खाते उघडल्यानंतर 21 वर्षाच्यानंतर खाते बंद करता येते. परंतू मध्येच खाते बंद करता येणार नाही. तसेच मुलीचे वय 18 वर्ष पुर्ण झाल्यावर विवाह केल्यास मुदत पुर्व खाते बंद करण्याची सुविधाही या योजनेत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ही योजना केवळ दोन मुलींसाठी पात्र असेल. अधिक माहितीसाठी जवळच्या डाकघर कार्यालयाशी संपर्क साधून सुकन्या समृध्दी योजनेच्या खात्यामध्ये गुंतवणूक करुन आपल्या मुलींचे भविष्य उज्ज्वल करावे.
– एम. ई. तुपसमिंद्रे
जिल्हा माहिती कार्यालय, जालना