जालना – क्रिप्टो करंसीच्या माध्यमातून एका बनावट वेबसाईटद्वारे शेकडो लोकांची फसवणूक करणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याचे कनेक्शन थेट गुजरातेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या संपूर्ण घोटाळ्यात मुख्य असणाऱ्या बनावट वेबसाईटच्या सर्वरच काम गुजरात मधील राजकोट इथून चालू होते. हा सर्व प्रकार तिथून ऑपरेट करण्यात येत होता. दरम्यान, जालना आर्थिक गुन्हे शाखेने सायबर एक्सपर्टच्या मदतीने सर्व्हर हँडल करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सर्व्हर व सॉफ्टवेयर ताब्यात घेतले आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी पुणे येथून ताब्यात घेतलेल्या चार जणाकडून आणखी दोन महागड्या गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आतापर्यंत एकूण 9 कोटी रुपयांचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणी जालना आर्थिक गुन्हे शाखेने पुणे आणि इचलकरंजी येथून चार आरोपींना बुधवारी (दि.08) रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यांना 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इरफान मोईद्दीन सय्यद, वेंकटेश दशरथ भोई, अमोद वसंतराव मेहतर, रमेश बाबुराव उत्तेकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांची बँकेतील खाती गोठवण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 122 लोकांची फसवणूक झालेली आहे यामध्ये तीन कोटी 39 लाख रुपयाची फसवणूक झाली असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झालेली आहे.
या प्रकारणाचा अधिक तपास पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक बी.डी फुंदे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, पोलीस अंमलदार फुलचंद गुसिंगे, गजु भोसले, गोपाल गोसिक, धिरज भोसले, अडीयाल, ज्ञानेश्वर खराडे आदी करीत आहेत.
अॅप डाऊनलोड करा आणि जिंका बक्षिसं… कोणार होणार भाग्यवान विजेता…? आजच करा डाऊनलोड