घनसावंगी – समृद्धी साखर कारखान्यात समृद्धी शुगर्स गणेश मंडळाच्यावतीने आयोजित समृद्धी फेस्टिवल -२०२३ ची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांच्या धडाकेबाज कार्यक्रमाने शनिवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या सांस्कृतिक कार्यक्रमास घनसावंगी मतदार संघातील रसिकांचा पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला.
पावसाच्या आगमनामुळे बळीराजा सुखावला असून समृद्धी फेस्टिवलच्या उत्साहात अधिक भर पडली आहे . शनिवारी या समृद्धी फेस्टिवलमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार, गायक शैलेश निसरगंध व संचाने सादर केलेल्या नृत्य व सुमधुर गीतांनी समृद्धी फेस्टिवलमध्ये रंगत आणली. भर पावसात उभा राहून घनसावंगीकरांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. प्रारंभी कारखान्याचे चेअमरन सतीश घाटगे,व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी, संचालिका वैशाली घाटगे, ज्येष्ठ संचालक दिलीप मामा फलके, रणजीत उढाण, अभिजित उढाण, सतीश चव्हाण, विकी शिंदे, फॅक्टरी मॅनेजर आर.एस.माथनकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी राजू छल्लारे , बाबा उढाण, अमोल तौर, सुनील घुले, परीक्षित शिंदे, पुरुषोत्तम उढाण, शिवाजी कंटूले, पांडुरंग भांगे आदींची उपस्थिती होती.
गायक शैलेश निसरगंध यांनी गणरायाचे वंदन गीत सादर करून कार्यक्रमास सुरूवात केली. माधुरी पवार यांनी आपल्या हटके अंदाजात सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांची मोठी दाद मिळाली. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात घनसावंगी मतदारसंघातील शेकडो नागरिक, तरूणांची मोठी उपस्थिती होती.




















