कृषी जगतातील डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांचे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. कारण त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून कृषी या महत्त्वपूर्ण विषयावर नाविन्यपूर्ण सखोल व विस्तृत संशोधन केले आहे. आयुष्यभर भूकमुक्त विश्वाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी अविरतपणे कार्य केले. इतकेच नव्हे तर त्यांनी भारताला अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतात हरितक्रांती घडवून आणली त्यामुळे त्यांना भारतातील पहिल्या हरितक्रांतीचे जनक म्हणूनही ओळखले जाते.
भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी भारतातील तामिळनाडू राज्यातील कुंभकोणम या ठिकाणी झाला. त्यांचे संपूर्ण नाव मोनकंबू संबाशिवन स्वामीनाथन असे होते. त्यांचे वडील संबाशिवन स्वामीनाथन व आई थंगम्मल स्वामीनाथन या होत्या. त्यांचे वडील वयाच्या 36 व्या वर्षी डॉ.एम. एस. स्वामीनाथन अकरा वर्षाचे असताना आजारपणामुळे निधन पावले. त्यानंतर त्यांचा व त्यांच्या भावंडांचा आणि आईचा सांभाळ त्यांचे काका नारायणस्वामी यांनी केला. स्वामीनाथन यांचा विवाह 1955 मध्ये मीना भूतलिंगम यांच्याशी झाला. त्या उच्च विद्या विभूषित होत्या त्यांना सौम्या, मधुरा व नित्या या तीन मुली असून सौम्या बालरोगतज्ञ, मधुरा अर्थशास्त्रज्ञ तर नित्या समाज शास्त्रज्ञ म्हणून कार्य करत आहेत.
डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला असला तरी त्यांनी शिक्षण व संशोधन क्षेत्रात खूप प्रगती केल्याचे आपल्याला दिसून येते. 1944 मध्ये त्रावणकोर विद्यापीठातून प्राणीशास्त्र विषयातून बी.एस.सी ची पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी याच शाखेतून शिक्षण न घेता. 1942-43 मध्ये भारतातील पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भीषण दुष्काळाचे सावट पसरले होते त्यामुळे लाखो लोक अन्नधान्या वाचून भूकेपोटी तडफडून मेल्याच्या घटनेने स्वामीनाथन यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला त्या घटनेने त्यांच्या शिक्षणाची दिशा बदलली. अन्ना वाचून होणाऱ्या भूकबळीची समस्या संपविण्यासाठी, कृषी क्षेत्रात संशोधन करता यावे म्हणून त्यांनी कोईमतूर येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन 1947 मध्ये कृषी शास्त्रातील पदवी प्राप्त केली व पुढे पदव्युत्तर पदवी ही प्राप्त केली. त्यानंतर ते स्पर्धा परीक्षा ही उत्तीर्ण झाले परंतु त्यांनी नोकरी केली नाही. कृषी क्षेत्रात काम करणे अवघड आहे असे अनेक जण त्यांना सांगत असले तरी त्यांनी कृषी क्षेत्राचीच निवड केली. विदेशात जाऊन संशोधन कार्य केले यासाठी युनोस्को व नेदरलँड सरकारकडून त्यांना फेलोसिफ ही मिळाली. त्त्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठांमधील स्कूल ऑफ ॲग्रीकल्चर या ठिकाणी वनस्पती पैदास संस्थेत संशोधन कार्य केले. जनुक शास्त्रातील अर्थात कृषी क्षेत्रातील अभ्यासावर आधारित प्रबंध सादर केल्यामुळे त्यांना पी.एच.डी.ची व पोस्ट डॉक्टरेटची पदवी मिळाली.
डॉ. एम. एस. स्वामीनाथन विदेशातील शिक्षण संपल्यानंतर विदेशात नोकरीची संधी असताना परंतु भारतात संधी नसताना देखील देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतात परत आले. परत येऊन एका ठिकाणी छोटीशी नोकरी स्वीकारली. ते त्या नोकरीत न रमता ते भारतीय कृषी संशोधन संस्थेत कार्य करू लागले पुढे ते या संस्थेचे संचालक ही झाले. याच कार्यकाळात त्यांनी गहू,दाळ, भात, बटाटा इत्यादी पिकाविषयी संशोधन कार्य करून देशातील उत्पादनात भरघोस वाढ घडवून आणली. जागतिक हरितक्रांतीचे जनक नॉर्मन ई बोरलॉग यांना भारतात घेऊन आले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशात 1965-66 मध्ये हरितक्रांतीचा कार्यक्रम राबविला या क्रांतीचे स्वामीनाथन हे जनक म्हणून ओळखले जातात कारण त्यांच्याच प्रेरणेने व कार्यामुळे देशात हरितक्रांती घडून आली त्यामुळे देशातील अनेक राज्यांचा व विविध पिकांचा विकास झाल्याचे व आजही होत असल्याचे आपल्याला दिसून येते.
भारतातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांमध्ये डॉ.एम एस स्वामीनाथन यांनी कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल देश-विदेशात घेतली गेली त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले विशेषतः 1967 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 1972 मध्ये पद्मभूषण पुरस्कार, 1979 मध्ये बोरलॉग पुरस्कार, 1986 मध्ये कृषिरत्न पुरस्कार, 1989 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार तसेच 1971 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचा समजला जाणारा रॅमन मॅक्सेस पुरस्कार इत्यादी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा हा सन्मान त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्यामुळेच झाला होता.
डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांनी विविध विषयावर विशेषतः कृषी विषयावर आधारित अनेक संशोधन पर ग्रंथ लिहिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पी.एच.डी.पदवी प्राप्त केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक विद्यापीठांनी डॉ.एम.एस स्वामीनाथन यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली. डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली 2004 मध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना करण्यात आली. हा आयोग स्वामीनाथन आयोग या नावानेही ओळखला जातो. या आयोगाने भारतातील शेतकऱ्यांच्या दूराअवस्थेची कारणे व त्यावर विविध उपाय योजना सुचविलेल्या आहेत. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला नफ्यातील 50 टक्के वाटा मिळावा तसेच शेतकऱ्यांचा खर्च वजा करून सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे उत्पन्न मिळावे त्याचबरोबर हमीभाव दुप्पट मिळावा इत्यादी शिफारसी त्यांनी शेतीच्या व शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी सुचविलेल्या आहेत. परंतु शासनाने त्यांच्या या शिफारसी अद्याप लागू केलेल्या नाहीत. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांची स्थिती दैनिय होत असल्याचे दिसते.
डॉ.एम.एस.स्वामीनाथन हे अविरतपणे शेती व शेतकऱ्यांचा विचार करणारे चिंतन करणारे अभ्यास करणारे संशोधन करून उपाययोजना सुचवणारे महान सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ होते. डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांचे 28 सप्टेंबर 2023 रोजी वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. ते आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांनी वेळोवेळी कृषी क्षेत्रात केलेले संशोधन,अभ्यास, चिंतन, विचार, कार्य भारतीय शेतकऱ्यांना व कृषी क्षेत्राला संजीवनी देऊन कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यासाठी भविष्यातही मार्गदर्शक ठरणार आहे. अर्थात किर्ती रूपाने, कार्यरूपाने व विचार रूपाने ते कायम आपल्या सोबत असणार आहेत. अशा महान कृषी शास्त्रज्ञास विनम्र आदरांजली व्यक्त करण्यासाठी हा लेख लिहिला आहे.
– डॉ. ए. बी. मुळीक
सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग
वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड