उरण (तृप्ती भोईर) – कोरोना काळात सफाई कामागारांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोरोना काळातही आणि आताही आपले जीव धोक्यात घालून नागरिकांची, जनतेची रांत्रदिवस सेवा करणारे स्वच्छता कर्मचारी हे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा आहेत. स्वच्छता दूत आहेत. त्यांचा सर्वांना अभिमान आहे असे गौरवोदगार काँग्रेसचे उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी काढले.
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता उरण तालुका काँग्रेस कार्यालयात उरण तालुका व उरण शहर काँग्रेस तर्फे महात्मा गांधी वा लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर लगेचच सफाई कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या संकल्पनेतून व प्रकाश पाटील यांच्या विशेष पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सफाई कामगाराना स्त्रियांना साडी तर पुरुषांना शर्ट,पॅन्ट पीस तसेच गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश पाटील यांनी सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करून आपली भूमिका स्पष्ट केली. अनेक ठिकाणी सफाई कर्मचा-यांचा योग्य तो मान सन्मान होत नाही असे खंत व्यक्त करत सफाई कर्मचा-यांना मानसन्मान देण्याच्या हेतूने व त्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याच्या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती प्रकाश पाटील यांनी दिली.
उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, शहराध्यक्ष प्रकाश पाटील,रायगड जिल्हा जेष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर,उरण विधानसभा अध्यक्ष भालचंद्र घरत, महिला जिल्हा उपाध्यक्ष संध्या ठाकूर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अकलाख शिलोत्री, मच्छिमार नेते मार्तंड नाखवा, सेवादल रायगड जिल्हा सेक्रेटरी ज्ञानेश्वर पाटील, जेष्ठ कार्यकर्ते अली मुकरी, सेवादल जिल्हाध्यक्ष कमलाकर घरत, महिला अध्यक्ष रेखा घरत, कळंबूसरे ग्रामपंचायतचे सरपंच सारिखा पाटील, उरण शहर उपाध्यक्ष नदाफ अकबर, महिला शहर अध्यक्ष अफशा मुकरी, उरण शहर उपाध्यक्ष गुफरान तुंगेकर, भेंडखळचे उपसरपंच दिपक ठाकूर, केगाव गाव अध्यक्ष सदानंद पाटील, अय्याज फकिह, सुनील काठे आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कैलास राठोड, नरेश पावसकर यांच्यासह उरण नगर परिषदेचे २३ ते २५ सफाई कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सफाई कर्मचारी महेंद्र साळवी यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानत असा मानसन्मान आम्हाला कधीच मिळाला नाही. काँग्रेसतर्फे आमचा सत्कार झाला त्यामूळे आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते , प्रोत्साहन मिळते असे मत व्यक्त केले. या सफाई कर्मचारी मध्ये सर्वाधिक संख्या स्त्रियांची होती. सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आयोजित केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमाला सफाई कर्मचा-यांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.