जालना – शहरातीलकन्हैयानगर चौकत कार आणि दुचाकीच्या धडकेत झालेल्या भिषण अपघातात दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कन्हैय्यानगर ते जामवाडी रोडवर घडलीय. तौसिफ शेख ईस्माईल (वय 15), असं मयत मुलाचं नाव आहे.
या संदर्भात सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, तौसिफ हा सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास त्याच्या काका सोबत जालन्याकडे येत होता. दुचाकीवर तौसिफ हा मागे बसलेला होता. त्यांची दुचाकी कन्हैय्यानगर टी-पाईंटवर आल्यानंतर जालन्याहून नाव्हाकडे टर्न घेतलेल्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यात तौसिफ हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्या प्रमाणे ठार झालेला मुलगा हा अपघातात 15 ते 20 फुटापर्यंत उंच उडून रस्त्यावर पडला. डोक्यात जबर मार लागल्यामुळे तो जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती मिळताच सदर बाजार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघातस्थळ तालुका ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने याबाबत तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या प्रकरणी तालुका ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद नव्हती.




















