जालना येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या परिसरात असलेल्या खुल्या जागेत लावण्यात आलेल्या झाडांचा आठवा वाढदिवस सोमवार दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.
आठ वर्षापुर्वी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त बलभिम शिंदे यांच्या पुढाकाराने लावण्यात आलेल्या झाडांचे जतन करुन त्यांचा नियमित वाढदिवस साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय विभाग जालना, उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने हा वाढदिवस साजरा करण्यात येतो. या वर्षी निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेच्या वतीने देखील सहभाग नोंदविला असून ही परंपरा पुढे कायम सुरु ठेवण्याचा संकल्प केला.
समाज कल्याण विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी लावलेली झाडे जगवीली आहेत. बलभिम शिंदे यांची बदली झाल्याने त्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सामाजिक कार्यकर्ते आणि समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातील कर्मचार्यांनी कायम ठेवली आहे. दर वर्षी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची एक परंपरा सुरु झाली आहे. या वर्षी देखील जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते केक कापून झाडांचा आठवा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच यावेळी पुन्हा नव्याने वृक्षलागवड करण्यात आली.
उन्हाळी परिस्थीती असतांना सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचार्यांनी वर्गनी जमा करुन स्वतंत्र बोअरवेल खोदली. यासाठी संतोष आढे यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे झाडांना पाणी देण्याचा प्रश्न सुटला. लावलेली पुर्ण झाडे जगली आहेत. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय हे हिरव्यागार झाडांनी बहरले आहे. या परिसरात सुमारे 3 हजार झाडे असून त्याचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जात आहे.
यावेळी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास निवासी उप जिल्हाधिकारी सोहम वायाळ, निवडणूक विभागाचे उप जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत कदम, गणेश अंबुरे, संतोष आढे, देवानंद सानप, संदीप कांबळे, गजानन गवळी, निसर्ग रक्षक प्राणीमित्र संघटनेचे विशाल गायकवाड, मयुर साबळे, शिवाजी डाकूरकर, गोपिनाथ ढोले, शैलेश मुळे, समाजकल्याण विभागाचे कर्मचारी सतिष पळसकर, हरीदास भोपळे, संदीप जाधव, तुकाराम वाघ, भिम गायकवाड, मिलींद गाढे, गुलाब चव्हाण, शारदा जावळ, सुलोचना साबळे, रोषण गोणेकर, तातेराव लोखंडे यांची उपस्थिती होती.