नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी एका शाळकरी मुलींची छेडखाणी आणि विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. मात्र पोलीस तपासात या प्रकरणात पोलिसांना अधिक धक्कादायक माहिती मिळाली आहे. रवी प्रकाश लाखे असं या आरोपीचे नाव असून तो शटर दुरुस्तीचं काम करतो. अशातच तो नंदनवन परिसरात एका खाजगी शाळेच्या समोर असलेल्या दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आला होता. या दरम्यानच्या काही तासात त्यानं एक-दोन नव्हे तर स्टेशनरी दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या सुमारे 15 हून अधिक चिमुकल्या मुलींशी अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याचे पुढे आले आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी लाखे याने येथील दुकानात आलेल्या चिमुकल्या मुलींशी अश्लील कृत्य केलं. मात्र सुरवातीला भीती आणि अज्ञानामुळे आरोपीचे हे घृणास्पद कृत्य त्या चिमुरडीला समजू शकले नाही. तसाच तीने या कृत्याची कुठे वाच्छाता ही केली नाही, परिणामी आरोपीने इतरांशीही हेच कृत्य करण्याचे धाडस केलं. मात्र त्यातील काही विद्यार्थिनींनी शाळा सुटल्यानंतर हा सर्व प्रकार घरी जाऊन पालकांना सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी शाळा गाठत या घटनेची माहिती दिली.
तक्रार दाखल होताच अनेक घटना उघड
या खळबळजनक माहितीनंतर शाळा प्रशासनाने तात्काळ नंदनवन पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली. दरम्यान, प्रथमदर्शनी हा प्रकार केवळ एका शाळकरी मुलीच्या छेडखाणी प्रकरणाशी संबंधीत असल्याचे पुढे आले असले तरी, पोलिसांत तक्रार दाखल होताच अनेकांसोबत हाच प्रकार घडल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रवी विरुद्ध पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हायरल; युवकावर गुन्हा दाखल
इंस्टाग्रामच्या ओळखीतून अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध निर्माण करीत युवकाने अत्याचार केला. त्यानंतर तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणात अत्याचारग्रस्त मुलीच्या तक्रारीवरून कार्तिक सुनील कोहरे या युवकावर यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा सोध सध्या पोलीस घेत आहे. तर प्रकरणातील पिडीत अल्पवयीन मुलगी ही अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहे.




















