जालना जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा कळस मोडून काढण्यासाठी चक्क बीड येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाला कारवाई करावी लागलीय. वाळू वाहतुकदारावर केलेल्या कारवाईत मदत करण्यासाठी तब्बल 1 लाख 80 हजार रुपये घेतांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, पोलीस काँस्टेबल गोकुळदास देवळे आणि खाजगी इसम विष्णू बालासाहेब कुरदणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती शनिवार दि. 1 मार्च 2025 रोजी रात्री 9 वाजता पोलीस सुत्रांनी दिलीय.
तक्रारदार यांच्या ताब्यातील टिपर क्रमांक एमएच 37 टी 2018 च्या अनुषंगाने तक्रारदाराचा भाऊ व इतराविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गौण खनिज प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड व पोलीस कर्मचारी देवळे यांनी खाजगी इसम कुरदणे यांच्या मार्फत टिपर सोडण्यासाठी व तक्रारदार यांच्या भावाच्या जामीनाला मदत करण्यासाठी लाच मागीतली होती. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड व पोलीस कर्मचारी देवळे यांच्यासाठी 1 लाख 80 हजार रुपये लाच घेतांना खाजगी इसमाला बीडच्या लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.





















