जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला बचत गटाच्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री जानकी महोत्सव 2025 जालना शहरातील कल्याणराव घोगरे स्टेडीअमवर सुरु आहे. परंतु, या प्रदर्शनाची कोणहीती जाहिरात किंवा प्रचार झाला नसल्याने या बचत गटाचे उत्पादने खरेदी करण्यासाठी कुणीही फिरकत नसल्याचा प्रकार शनिवार दि. 1 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता उघडकीस आलाय.
स्वर्गीय कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल येथे जानकी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मात्र या महोत्सवाचा कोणाताही प्रचार प्रसार झाला नाही. त्यामुळे शहरात नेमके कुठे काय सुरु आहे हे कुणालाच कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे घरोघर वाटप करण्यासाठी पॉम्पलेट तयार करण्यात आले. त्यावर लाखोर रुपये खर्च करण्यात आले. मात्र ते वाटप करण्यात आलेच नाहीत. सदरील पॉम्पलेट हे स्टॉलवर गठ्याने ठेवण्यात आल्याचे पहायला मिळाले. जर हे पॉम्पलेट स्टॉलवरच ठेवायचे होते तर छापलेच कशाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. या महोत्सवाचा पुरेसा प्रचार प्रसार नसल्याने कुणीही या प्रदर्शनाकडे फिरायला तयार नाही. त्यामुळे 8 जिल्ह्यातून आलेल्या महिलांची उत्पादने विक्री होत नसल्याच्या प्रतिक्रीया महिलांनी व्यक्त केल्या. दोन दिवसात केवळ 100 ते 150 रुपयाची उत्पादने विक्री झाल्याचे महिलांनी सांगीतले. शिवाय महिलांना दिले जाणारे जेवन देखील निकृष्ठ दर्जाचे आहे. काहींनी जेवन न करता गटाच्या महिलांकडूनच जेवन विकत घेऊन त्यावरच समाधान मानले. शिवाय महिला या 28 तारखेपासून 6 मार्च पर्यंत प्रदर्शनासाठी थांबनार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्टॉलवर मोबाईल चार्जींगची सुविधा देणे आवश्यक होते. मात्र कोणत्याही स्टॉलवर मोबाईल चार्जींगची सुविधा दिलेली नाही. त्यामुळे महिलांनी मोबाईल चार्ज तरी कसा करायचा आणि नातेवाईकांच्या संपर्कात राहुन खुशालीचा निरोप कसा द्यायचा असा प्रश्न महिलांनी उपस्थित केलाय. वस्तु विक्रीला प्रतिसाद मिळत नसल्याने काही बचत गटाच्या महिलांनी स्टॉल रिकामा करुन निघून जाणे पसंत केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्टॉल राकामेच असल्याचे पहायला मिळाले. अनेक महिला या स्वखर्चाने या ठिकाणी आल्या असून काहींना गाडी करुन आणले गेले. मात्र जायचे कसे हे अजुन स्पष्ट झाले नाही. शिवाय वस्तु विक्री होत नसल्याने घरी परत जायचे कसे असा प्रश्न महिलांना पडलाय.
उमेदच्या निष्क्रीय अधिकार्यामुळे महिलांची उमेदच हरवली…
महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचारी हे जरा रस्ता भटकलेल्या माणसासरखे करु लागल्याचे दिसून येत आहे. दिलेली कामे प्रमाणीकपणे पार पाडली तर कदाचित महिलांसाठी योग्य त्या सुविधा दिल्या असत्या. बचतगटाने उत्पादीत केलेल्या मालाचे विक्री प्रदर्शन हे काही एका दिवसात भरविले नाही. प्रदर्शनासाठी जो मंडप दिला तो काही एकाच रात्रीत उभा करता येत नाही. याचे आगोदरच प्लॅनिंग असतांनाही मिडीयापासून त का लवपिण्यात आले? प्रदर्शन हे जालना येथे भरविण्यात येणार आहे, ही माहिती का दडविण्यात आली? दोन दिवस आधी पत्रकार परिषद घेऊन त्याची माहिती का देण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आता महिलांची उत्पादने विक्री होत नसल्याने उमेदीने आलेल्या महिलांची ना उमेद झाली आहे. ज्या उद्देशाने महिला बचत गटाच्या नियोजनाला उमेद नाव देण्यात आले आणि ज्या उमेदीने महिला उत्पादने तयार करुन आर्थीक उन्नती साधण्याची उमेद बाळगून या वस्तु विक्री प्रदर्शनासाठी घरदार सोडून आल्यात त्यांची आज नाउमेद झालेली आहे. त्यामुळे निष्क्रीय अधिकार्यांमुळे महिलांची उमेद हरवली हे मात्र नक्की…

नियोजनाच्या आभावाने चविष्ठ पदार्थही झाले बेचव
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियोजनाच्या आभावाने या वस्तु विक्री व प्रदर्शनात चविष्ठ पदार्थ घेवून आलेल्या महिलांचे खाद्य पदार्थही बेचव झालेत. कुणीही फिरकत नसल्याने त्यांचे खाद्य पदार्थ तसेच पडून आहेत. त्यामुळे उत्पादीत केलेला माल जास्त दिवस कसा टिकवून ठेवायचा असा प्रश्न महिलांसमोर आहे.
महिलांच्या माथी व्याथा कायमच…
महिलांना बाजारपेठ उपलब्ध करुन त्यांना व्यवहाराचे ज्ञान देण्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करते. मात्र जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत उमेदच्या अधिकार्याकडून महिलांना सक्षम करण्याचा दावा करुन त्यांची फसवणूकच केली जाते. त्यांच्यासाठी विक्री पदर्शन भरविण्यात आले खरे, परंतु, त्यात महिलांना सक्षम न करता केवळ ठेकेदारांना सक्षम करण्याचे काम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून करण्यात आले. महिलांना स्टॉल दिले परंतु, त्यांना विद्युत पुरवठा करण्यात आला नाही. महिलांना 6 दिवस थांबण्यासाठी सांगण्यात आले, परंतु, महिलांच्या स्टॉलवर मोबाईल चार्जींगची साधी सुविधा दिली नाही. महिलांना मुक्कामी थांबविले खरे परंतु, त्यांना निकृष्ठ दर्जाचे जेवण देऊन त्यांच्यावर अन्यायच केलाय. खरं तर ज्या महिलांना चविष्ठ खाद्यपदार्थ बनविता येतात. त्यांनाच बेचव खाद्य पदार्थ खान्याची वेळ आली. हा महिलांच्या कर्तबगारीचा अपमान आहे.
महिलांना सक्षम करण्याचा उद्देश आहे तर जेवनाचा ठेका महिलांना का नाही?
महिलांना सक्षम करण्याच्या वल्गना करणार्या सरकारी अधिकार्यांनी खरंच महिलांना सक्षम करायचे आहे की, महिलांच्या नावाखाली स्वतःची दुकानदारी लावायची आणि स्वतः सक्षम व्हायचे आहे? जर महिलांना सक्षम करायचे असेल तर त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद अंतर्गत महिला बचत गटाच्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री जानकी महोत्सवात सहभागी झालेल्या महिलांच्या जेवनाचे कंत्राट एखाद्या महिला बचत गटाला का दिले नाही?
स्थानिक अधिकार्याच्या हलगर्जीपणामुळे लाखो रुपये पाण्यात
बचत गटाच्या महिलांनी उत्पादन केलेल्या वस्तुचे विक्री व प्रदर्शन भरवुन त्यातून महिलांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे हा शासनाचा उद्देश आहे. मात्र या उद्देशावर स्थानिक अधिकार्यांच्या बेजबाबदारपणामुळे पाणी फिरले आहे. शासनाने लाखो रुपये पाण्यात गेलेत. शिवाय हा वस्तु विक्री व प्रदर्शन महोत्सव हा विभागीय स्तरावर असतांनाही त्याचा प्रचार आणि प्रसार केला नाही. साधी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्याचे धाडसही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांनी केला नाही. अधिकार्यांना माहिती विचारुनही माहिती दिली नाही. त्यावरुन अधिकार्यांची उदासीनता दिसून येत आहे.























