जालना येथील उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. 26 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जुना जालना येथे महिलांसाठी हिरकणी महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवात महिलांच्या आवडीचा होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे. तसेच महिलांसाठी विविध योजना आणि माहितीचे स्टॉल देखील या ठिकाणी राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला सर्व महिलांनी उपस्थित रहावे असे संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणा अच्युत मोरे यांनी केले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जालना समाजकार्य महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. राजकुमार म्हस्के यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणून पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, गटविकास अधिकारी संदीप पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेच्या 5 व्या वर्धापण दिनानिमित्त हिरकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान महिला सक्षमीकरण अभिया अंतर्गत संस्थेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या हिरकणी सुरक्षा अभियानाची सुरुवात देखील हिरकणी महोत्सवात होणार आहे. हिरकणी सुरक्षा अभियान अंतर्गत 19 ते 35 वयोगटातील मुली आणि महिलांची मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. दरम्यान महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर ठेवण्यात आले आहे. महिला आणि बालकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल आणि अर्ज कार्यक्रमाच्या स्थळी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
महिलांच्या आवडीचा आणि पसंतीचा होम मिनिस्टर कार्यक्रम देखील आयोजित केला असून त्यात महिलांना पैठणी, चांदीचं नाणं, रोख रक्कम जिंकता येणार आहे. यावेळी राज्यभरातील विविध क्षेत्रात काम करणार्या कर्तबगार महिलांचा हिरकणी पुरस्काराने गुणगौरव होणार आहे. कार्यक्रमासाठी आलेल्या पहिल्या 200 महिलामधून 3 भाग्यवान विजेत्या महिलांना पैठणी मिळणार आहे.
कार्यक्रमाचे खास आकर्षण
झी- टॉकीज, झी-मराठी, कलर्स मराठी, सोनी मराठी अशा विविध वाहीन्यावर प्रसिध्द असलेले शाहीर रामानंद उगले यांचा महिलांसाठीचा भव्य सांस्कृतीक कार्यक्रम देखील होणार आहे. यामध्ये भारुड, गवळण, पोवाडा, लोकगीताचे सादरीकरण होणार असून सिंगापूर रिर्टन लावणी सम्राज्ञी स्नेहा दुधाळ यांचा परफॉर्मंस देखील होणार आहे.
जगातील पहिल्या सर्प मैत्रिणीची उपस्थिती
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तसेच जगातील पहिल्या सर्प मैत्रीण आणि सर्प रक्षक असलेल्या वनिता बोराडे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार असून त्यांच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन होणार आहे.