जालना जिल्ह्यातील रोषणगाव महसूल मंडळात काल झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि बदनापूर-अंबड विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी प्रत्यक्ष पाहणी बुधवार दि. 28 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास केली. यावेळी तालुका कृषि अधिकारी गोपाल गुजर, प्रभारी तहसिलदार तायडे सह आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि बदनापूर-अंबड विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी बाजार वाहेगाव येथील शेतकरी नवनाथ भिमराव लांडगे यांच्या शेतातील अतिवृष्टीने ढासळलेल्या विहीरीची पाहणी केली. तसेच बाजार वाहेगावातील नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची देखील पाहणी केली. तसेच वाकुळणी येथील शेतकरी गणेश सुदामराव कोळकर यांच्या नुकसानग्रस्त डाळींब बागेची पाहणी केली. कडोळी येथील नाल्याची देखील पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी तहसिलदार बदनापूर आणि तालुका कृषि अधिकारी बदनापूर यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच आमदार नारायण कुचे यांनी अतिवृष्टीने बाधित सर्व शेतकर्यांना जास्तीत-जास्त मदत शासनाकडुन उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतुद करण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी महसुल आणि कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.