महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढला जात आहे. तर दुसरीकडे या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल करत राज्यपालांना लक्ष्य केलं आहे.
सुप्रिया सुळेंनी वारंवार सत्ताधारी पक्षातील लोकांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांचा यावेळी समाचार घेतला. “एखाद्याने कुठली चूक एकदा केली ठीक आहे, दोनदा केली तर ठीक आहे. पण पुन्हा पुन्हा चूक कशी होते? ती चॉईस असते, मग ती चूक नसते”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी केलेल्या वक्तव्यांवरून सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. “राज्यपालांनी अद्याप दिलगिरी व्यक्त केलेली नाही. त्यामुळे निवडकपणे दिलगिरी व्यक्त केली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही एवढा हल्लाबोल करत असताना महाराष्ट्रातल्या कुणी काहीही केलं नाही. सगळे चुपचाप बसले होते. आम्ही गेलो होतो अमित शाह यांच्याकडे. खरंतर अमित शाह यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी मध्यस्थी केली. नाहीतर आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हातावर हात ठेवून बसले होते. त्यांनी दिल्लीला जायला नको होतं का?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.