कुंभारी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेचा दुरुपयोग करीत इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थामार्फत मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांनी केल्या.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शितलताई म्हेत्रे, निर्मला जवळे, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बिपिन करजोळे, कार्याध्यक्ष रवी होनराव, पंचायत समितीचे माजी उपसभापती अप्पासाहेब बिराजदार, युवा नेते रोहित बिराजदार, सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक शिवशंकर बिराजदार ,आप्पासाहेब कटारे, आदी उपस्थित होते.
सर्व धर्म समभाव विचारसरणी असणाऱ्या लोकांना धर्मावर मतदान करायला भाजप हे प्रवृत्त करतायेत. ज्या दिवशी असे व्हायला लागेल त्या दिवशी लोकशाहीला खतरा निर्माण व्हायला लागतो. म्हणून जागे व्हा, जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दबू देणार नाही. मला फक्त एकदा मतदान रुपी आशीर्वाद द्या. मी ईडीपीडीला घाबरत नाही, मी राजकारणात टक्केवारी आणि सत्तेसाठी आलेली नाही असेही त्या म्हणाल्या.
मागच्या दहा वर्षात मतदारांनी सगळं भाजपला दिलं मात्र प्रत्येक वेळी भाजपने सांगितलं की हा उमेदवार निष्क्रिय आहे त्यामुळे हा उमेदवार असे म्हणत प्रत्येक वेळी उमेदवार बदलतात यंदा तरी उपराच उमेदवार सोलापूरसाठी लादलाय. प्रत्येक वेळी भाजप धोका दिला. विश्वासघात केला. निवडून दिलेल्या भाजपच्या खासदाराने काय काम केलं हा एकच प्रश्न त्यांना विचारा त्यांची बोलती बंद होईल. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले आहेत. गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. फक्त जाहिराती करायच्या आणि सत्ता मिळवायची असे भाजपाचे धोरण आहे. मोदी रोजगार या विषयावर बोलतच नाहीत. याउलट 100 सुशिक्षित मुलांमागे 83 मुले बेरोजगार आहेत ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना चार पैसे जास्तीचे मिळत असताना कांदा निर्यात बंदी, साखर निर्यात बंदी घालून बाजारभाव पाडले जातात हे सरकार शेतकरी विरोधी आहे.
सुशीलकुमार शिंदे खासदार असताना एनटीपीसी, उजनी ते सोलापूर पाईपलाईन, लिंबिचिंचोळी येथील पावरग्रीड अशी अनेक विकास कामे म्हणून रोजगार उपलब्ध केली, मात्र भाजपाच्या लोकांनी शेतकऱ्यांचे दैवत असणाऱ्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी, द्वेष भावनेतून पाडण्यात आली.
यावेळी माझी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, रवी होनराव, बिपिन करजोळे आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक लारा चांगले यांनी केले तर धर्मराज गुंडे यांनी आभार मानले.