कुंभारी : लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाल्यापासून आपला, परका यावर वादंग माजले असताना सोलापूरच्या सुपुत्री आमदार प्रणितीताई शिंदे कौल मागण्यासाठी जनतेच्या दारात जात आहेत तर भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते नेत्यांच्या घरी जाऊन पाठबळ मागत आहेत.
सोलापूर लोकसभेवर गेल्या दोन टर्ममध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले. ॲड. शरद बनसोडे यांच्या रूपाने अक्कलकोटवासी स्थानिक उमेदवार लाभले. त्यांचा पाच वर्ष कार्यकाळ तसा कोणाला भावला नाही किंवा दिसला नाही. त्यानंतर पुन्हा उमेदवारी गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना मिळाली. बहुभाषिक, संस्कार संपन्न आणि भगवाधारी महाराज म्हणून त्यांना सगळ्यांनी डोक्यावर घेतलं. प्रचंड मताधिक्याने ते विजयी झाले. वाटलं होतं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मठ, मंदिरांचे कायापालट होईल. मात्र त्यांची कार्यकीर्द सगळ्यांची निराशा करून गेली. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून सात ते आठ महिन्याचा कालावधी लोटला तरी विमानाचा पत्ता नाही. विमान उडवण्याच्या नादात असलेल्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांचे तिकीटही कट झाले. ना सोलापूरकरांना विमानाचे तिकीट काढता आले ना महाराजांना उमेदवारीचे तिकीट मिळाले. या पार्श्वभूमीवर अनेक खलबते झाले. माजी खासदार अमर साबळेंपासून ते डिक्कीचे संस्थापक उद्योजक पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळेंपर्यंत अनेक नावे चर्चेला गेली. अधूनमधून भाजपने आ. प्रणितीताई शिंदे भाजपमध्ये येणार आहेत अशा पुढ्या सोडल्या. या सगळ्या बाबी चर्चापुरत्या मर्यादित होत्या. मात्र सरत्या शेवटी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना तिकीट जाहीर झालं. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांनी बाईक रॅली काढली. सोलापुरातील भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली. इकडे काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे मात्र मागील दोन पराभवाचा वचपा काढण्यासाठी थेट जनतेच्या दारात जाऊन कौल मागत आहेत. विकासाचे मुद्दे मांडत आहेत आणि दहा वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्याचे झालेल्या नुकसानाचे गणित मांडत आहेत. थेट जनतेच्या दारात जाणे आणि नेत्यांच्या घरात जाणे या दोन्ही बाबी परस्परविरोधी असल्या तरी सोलापूरच्या सुपुत्री म्हणून आ. प्रणितीताईंची ओळख आहे. शिवाय शहर मध्यमध्ये त्यांनी केलेलं काम सगळ्यांना ज्ञात आहे. ही विकासाची पोचपावती घेऊन त्या मतदारसंघ पिंजून काढत आहेत. इकडे भाजपचे उमेदवार मात्र उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत असे समजून मला विजयी करा असे आवाहन करत आहेत. यामुळे मतदार संभ्रमात आहेत. गत दोन टर्ममध्ये भाजपला स्थानिक उमेदवार एक वकील आणि दुसरे महास्वामी मिळूनही जनतेचा संपर्क त्यांनी साधला नाही आणि कोणाच्या गाठीभेटी घेतल्या नाहीत. शिवाय विकासाचा मुद्दा फारच दूर ठेवला. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक गुंतागुंतीची आणि मतदारांचा संभ्रम वाढवणारा ठरत आहे. सोलापूर शहराच्या पाणी प्रश्नापासून ते शेतकऱ्यांच्या दुष्काळ निधीपर्यंत, कांदा अनुदान, कांदा निर्यातबंदी हे मुद्दे भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असले तरी सोलार शेती, महामार्गाचे जाळे आणि समान नागरी कायद्याचे मुद्दे यावर भाजप मताचा कौल मागत आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सुरू असलेले राजकीय खलबते, दक्षिण सोलापुरातली नाराजी, उत्तर सोलापूर तालुक्यातील गटबाजी आणि प्रवाहापासून लांब असलेल्या मंगळवेढा- पंढरपूर मतदारसंघातील जनतेचा कौल काय असणार आहे यावरच विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.