जालना : गुवाहाटीला जाणाऱ्यांना खोके अन् रडत रडत शिंदे गटात सामील होणाऱ्यांना समृध्दी महामार्गावरील नाके बेकायदेशीर देऊन कार्यकर्त्यांना खुश करण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून केला जात आहे असा घणाघाती प्रहार जालन्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केला आहे.आपला आरोप खोटा असेल तर उद्याच आमदारकीचा राजीनामा देतो असे खुले आव्हान देखील त्यांनी यावेळी सभागृहात दिले.
जो गुवाहाटी को गये उनको मिले खोके…
जो रोते-रोते गये उनको मिले नाके…
आमदार कैलास गोरंट्याल यांचा माजी मंत्री खोतकर यांच्यावर हिवाळी अधिवेशनात घनाघात pic.twitter.com/qTNFHxJsdz— Hirkani News (@hirkaninews) December 22, 2022
नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काल बुधवारी सायंकाळी उशिरा आ.कैलास गोरंटयाल यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व आपल्या आक्रमक अशा खास शैलीत विविध मुद्द्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. भाषणाच्या प्रारंभीच अंधेरे चारो तरफ साई साई करने लगे ! चिराग हात उठाके दुवा मांगने लगे !! सलिका जिनको सिखाया था मैने चलने का !!! वही आज हमको दाये बाये करने लगे हा शेर खास आपल्या शैलीत सादर करत आ.कैलास गोरंटयाल यांनी सभागृहाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. जालना आणि बदनापूर या दोन तालुक्यातून जात असलेल्या समृध्दी महामार्गाच्या कामाचा मुद्दा उपस्थीत करतांना आ.गोरंटयाल म्हणाले की, या महामार्गाचे उद्घाटन नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अधिकृतरित्या झाले असले तरी या महामार्गाचे उद्घाटन यापूर्वीच झाले आहे. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी जालन्यातील काही मंडळींनी तब्बल ४०० वाहन याच मार्गावरून नियमबाह्य आणि कोणतीही परवानगी न घेताच नेली. खऱ्या अर्थाने त्याच वेळी या महामार्गाचे उद्घाटन झाल्याचे सांगून त्यात १२ वाहनांचा अपघात झाल्याने उद्घाटन होण्यापूर्वीच या महामार्गाला पनोती लागल्याचा चिमटा त्यांनी काढला. ज्या मंडळींनी या महामार्गावरून नियमबाह्य पद्धतीने ४०० वाहन नेली त्यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करून आ.कैलास गोरंटयाल यांनी समृध्दी महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल देखील गंभीर स्वरूपाचा आरोप केला. जालण्याचा स्टील उद्योग राज्यभर परिचित असून याच मतदार संघाचे आपण या सभागृहात प्रतिनिधित्व करत आहे. समृध्दी महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजा पासून तयार होणाऱ्या प्रायमरी स्टीलचा वापर होणे अपेक्षित असताना सदर कामासाठी दुय्यम दर्जाच्या स्टीलचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
जालना शहरातील जितके स्टील उद्योग आहेत ते सर्व स्क्रॅप पासून स्टील तयार करतात. आणि याच स्टीलचा वापर समृध्दी महामार्गाच्या कामासाठी करण्यात आला असून या स्टीलची लाईफ केवळ ५० ते ६० वर्ष इतकीच आहे. ही कसली समृध्दी आहे ? असा सवाल उपस्थित करून समृध्दी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आलेले स्टील, सिमेंट, डस्ट सर्वच दुय्यम दर्जाचे असल्याने समृध्दी महामार्ग आणि त्यावरील पुल १०० वर्ष कसे टिकतील याबद्दल आ.कैलास गोरंटयाल यांनी आपल्या भाषणातून शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, जालना ते नांदेड या नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या समृध्दी महामार्गाला मराठवाड्याचे भूमिपुत्र देशाचे माजी गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण यांचे नाव द्यावे व तसा ठराव सभागृहाने मंजूर करावा अशी आग्रही मागणी आ.कैलास गोरंटयाल यांनी यावेळी केली.
खोतकर यांना नाके दिल्याचा आरोप
हिवाळी अधिवेशनात सभागृहात बोलतांना आ.कैलास गोरंटयाल यांनी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केला. समृध्दी महामार्गावर शिर्डी ते नागपूर या दरम्यान असलेले टोल नाके खोतकर यांना मिळाले असून आपण जर खोटं बोलत असेल तर उद्याच आमदारकीचा राजीनामा देतो असे खुले आव्हान देत केवळ पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी शासनाने समृध्दी महामार्गाचा उपयोग केला. जे नाके दिले ते बेकायदेशीर दिले असल्याचा आरोप देखील आ. गोरंटयाल यांनी यावेळी केला.
त्या सहा पदरी रस्त्याचे काम जालना येथून करण्याची मागणी
औरंगाबाद ते पुणे या सहा पदरी रस्त्याचे काम सुरू करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच केली आहे. त्यांच्या या घोषणेच्या अनुषंगाने सभागृहात बोलतांना आ.कैलास गोरंटयाल म्हणाले की, जालना येथे स्टील, सिडस् उद्योग यासह अन्य उद्योग मोठया प्रमाणावर आहे. शिवाय ड्रायपोर्टचे काम देखील सुरू असून ही बाब लक्षात घेऊन सदर सहा पदरी रस्त्याचे काम जालना – औरंगाबाद – पुणे असे वाढवून करावे.यासाठी राज्य सरकारने तसा ठराव करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठवावा अशी मागणी करून हा प्रस्ताव मान्य झाल्यास जालन्यातील उद्योगाला अधिक चालना मिळेल असा विश्वास आ.कैलास गोरंटयाल यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.