मुंबई: भाजपने ‘मिशन 145’ सुरू केलं आहे. भाजपच्या या ‘मिशन 145’चं रणशिंग फुंकण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज विदर्भ आणि मराठवाड्यात आहेत. त्यामुळे जेपी नड्डा यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या या मिशनची राज्यात जोरदार चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र या मिशनची खिल्ली उडवली आहे. भाजप जर ‘मिशन 145’ सुरू करत आहे. तर शिंदे गटाला काय धुणीभांडी करायला ठेवणार आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.
भाजपचे जर ‘मिशन 145’ असेल तर त्यात शिंदे गट कुठे आहे? भाजपचे ‘मिशन 145’ असेल तर शिंदे गटाच्या लोकांना धुणीभांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भाजपच्या पायरीवरही यांना कोणी उभं करत नाही. ही तात्पुरती तडजोड आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणा. ते धर्मवीर नव्हते असं विधान केलं आहे. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर बोलण्यास संजय राऊत यांनी नकार दिला. याबाबत मला अभ्यास करावा लागेल, असं राऊत म्हणाले. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबादचं संभाजी नगर नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. या सरकारमध्ये त्या प्रस्तावाचं काय झालं? असा सवाल राऊत यांनी केला.
महाराष्ट्राच्या विधानसभेत विकासावर, योजनांवर बोलण्याची संधी मिळत असते. मुख्यमंत्री जर सभागृहात उखाळ्यापाखाळ्या काढायला लागले तर राज्याच्या विकासावर कोणी बोलायचं? त्यांचं भाषण ऐका. हे गल्लीतलं भाषण आहे. उखाळ्यापाखाळ्या काढण्याचं. त्यांना एक संधी मिळाली आहे. भले ती बेकायदेशीर मिळाळी असेल. पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून संयमाने बोलायला हवं, असा चिमटा त्यांनी काढला.
विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून बोलत आहात. कोणी मंत्री म्हणून बोलत असतो, तर कोणी विरोधी पक्षनेता म्हणून बोलत असेल तर त्यांनी कायद्याचं भान ठेवून बोललं पाहिजे. लोकांच्या समस्यांवर बोललं पाहिजे, असंही ते म्हणाले.
हिरकणी न्यूज ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978