भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबसंस्था आणि विवाह संस्थेला विशेष महत्त्व आहे. विवाहाच्या वेळी सप्तपदी व अन्य विधितून संस्कार केले जातात. विवाहानंतर कुटुंब संस्कृतीनुसार वाटचाल अपेक्षित असते. त्यामुळे कौटुंबिक वाद कितीही झाले, तरी संयम आणि सामंजस्याला प्राधान्य देत संसाराचा गाडा सुरळीत केला जातो. कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक वारसा यातून जपला जातो. परंतु, बदलत्या काळात जात, धर्माचा विचार न करता प्रेमविवाह मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशा विवाहांना कधी दोन्ही कुटुंबाची संमती असते, तर कधी वितंडवादाचे स्वरुपही येते. अनेकदा सामाजिक शांतताही भंग होत असते. अनेक प्रेमविवाह आदर्श ठरल्याचे पहायला मिळते. तर काही प्रेमविवाह टिकत नसल्याचेही दिसून येते. विवाह कुठल्याही स्वरुपाचा असला, तरी नंतरचा संसार टिकणे महत्त्वाचे असते. परंतु, बदलत्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीतून पती-पत्नींमध्ये होणारे वाद थेट न्यायालयापर्यंत पोहचतात. त्यामुळे करार करून लग्न टिकतील का? असाही प्रश्न पुढे येतो.
पाश्चात्य संस्कृतीचे अतिक्रमण थोपविण्याचे आवाहन एकीकडे केले जात असताना ॲग्रीमेन्ट मॅरेज, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाल्याच्या वार्ता कानी पडत आहे. पुणे जिल्ह्यातील दोघांनी अलिकडेच करार करून लग्न केले आहेत. करार हा लग्न टिकविण्यासाठी योग्य उपाय आहे का? अशी चर्चा पुन्हा एकदा रंगत आहे. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुखाचा क्षण असतो. लग्न कुठलेही असो मग ते लव्ह मॅरेज असो किंवा आरेंज मॅरेज असो! अनेक लग्न सोहळे आपण पाहिले असतील. मात्र, एका हटके लग्न सोहळ्याची सध्या चर्चा सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात हा सोहळा पार पडला आहे. यात विशेष म्हणजे नवरदेव आणि नवरीने एकमेकांसमोर सहा वेगवेगळ्या अटी ठेवल्या होत्या. त्यामुळे सर्वांनाच या लग्न सोहळ्याचे कौतुक वाटले.
लग्नानंतर मुलगा आणि मुलगी या दोघांचेही नवीन आयुष्याची सुरुवात असते. यात दोघेही आपल्या संसाराविषयी स्वप्न पाहत असतात. लग्नानंतर दोघांनीही एकमेकांना तेवढंच समजून घेणे महत्त्वाचे असते. जसा काळ बदलत आहे तशी लग्न करण्याची पद्धत देखील बदलत चालली आहे. त्यातील एक बदल म्हणजे पुणे जिल्ह्यात पार पडलेला विवाह सोहळा होय.
आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील कृष्णा लंबे आणि जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील सायली ताजने यांचा मंचर येथे विवाह सोहळा पार पडला. मात्र, हा लग्न सोहळा पार पडताना एक करार करण्यात आला. या करारामध्ये सहा अटी ठेवण्यात आले होते. ते मान्य झाल्यानंतर हा विवाह पार पडला. विशेष म्हणजे या करारनाम्याचे फलकही लावण्यात आले. फलक पाहून पाहुणे मंडळी आश्चर्यचकीत व अवाक झाले होते. या करारनाम्यावर साक्षीदार म्हणून पाहुणे व त्यांच्या मित्र आणि मैत्रिणींनी सह्या देखील केल्या आहेत. लग्नाच्या बंधनात अडकताना नवदाम्पत्यानं एकमेकांच्या अटी करारनाम्यात ठेवल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हा विवाह केला आहे. या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा रंगू लागली आहे. सहा अटींवर या दाम्पत्यानं एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सहा अटी आणि त्यानंतर झालेला हा विवाह सोहळा सद्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ