जालना – आवा अंतरवाला येथील अगणवाडी सेविकेला गावातील काही लोकांकडून त्रास दिला जात असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अंगणवाडी महिला कर्मचारी संघटनेकडून करण्यात आलीय. या संदर्भात पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आलंय.
अंगणवाडी सेवीकेला आवा अंतरवाला या गावातील दोन जनं हे दारू पिऊन अभद्र भाषेत आणि लज्जास्पद बोलून दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करतात. तसेच छेडछाड करुन महिला व बालविकास प्रकल्प अधिकार्याकडे खोट्या तक्रारी करून ब्लकमेल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलाय. या संदर्भात बालविकास प्रकल्प अधिकार्यांनी चौकशी करुन अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलाय. अंगणवाडीचे काम सुरळीत चालू असतनांही पैशाची मागणी पूर्ण न केल्यामुळे काही लोकांनी उपोषणाची धमकी देऊन अंगणवाडी सेविकेच्या निलंबनाची मागणी केलीय. या संदर्भात अंबड पोलीस स्टेशनला दोन वेळा तक्रारी दिल्या असल्याचेही तक्रारीत म्हटलंय. परंतु, त्यांच्या विरोधात ठोस कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढल्याचंही तक्रारीत म्हटलंय. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागमार्फत चौकशी करून महिलेची पिळवणूक व छेडछाड थांबवण्यात यावी नसता आंदोलन छेडण्याचा इशारा अंगणवाडी महिला कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आलाय.




















