जालना – जालना नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष विलासराव नाईक यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्वयंवर मंगल कार्यालय जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ब्राम्हण सभेस 11 लाख रुपयाचा धनादेश सुरुर्द करण्यात आला. यावेळी स्व. विलासराव नाईक यांच्या पत्नी भारती नाईक व मुलगी श्रेया नाईक यांनी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याणराव देशपांडे, रमेश देहेडकर व डॉ. सुभाष भाले यांच्याकडे हा धनादेश सुपुर्द करण्यात आलाय. यावेळी डॉ. संजय राख, माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर याची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना दीपक हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय राख म्हणाले की, विलासराव नाईक यांना आपल्यातून जावून वर्ष झाले, यावर आपला विश्वासच बसत नाही, विलासराव नाईक हे आपले जवळचे मित्र होते. एक स्पष्टोक्ते म्हणून त्यांची ओळख होती. याच स्पष्टोक्तेपणामुळे त्यांचं राजकीय नुकसान झालं. आपण आज जड अंत:करणाने स्वयंवर मंगल कार्यालयात पाऊल ठेवलंय. विलासराव नाईक यांच्या रूपाने निखळ मैत्री जपणारा मित्र गमावल्याची भावना यावेळी डॉ. राख यांनी व्यक्त केलीय.
यावेळी माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांनी बोलतांना म्हटले की, विलासराव नाईक हे स्वाभिमानी व्यक्तीमत्व होतं, राजकीय नेते मंडळींचा आदर करणारे विलास नाईक हे कधीही नेत्यांपुढे झुकले नाहीत, आपण 1996 मध्ये नगराध्यक्ष झालो, ते केवळ विलास नाईक यांच्या पाठबळावरच. नाईक यांच्या जाण्याने ब्राह्मण समाज एका धडाडीच्या नेतृत्वास मुकला आहे, सामाजिक कार्यास मदत करण्याची विलास नाईक यांची वृत्ती होती, ही परंपरा त्यांची पत्नी भारती व कन्या श्रेयस यांनी चालविलीय. ही समाधानाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलंय. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र देशपांडे यांनी केलं. यावेळी रसना देहेडकर, डॉ. सुभाष भाले, भगवानराव पुराणिक, जगदीश गौड, सतीश अकोलकर यांच्यासह विलासराव नाईक यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.




















