जालना – शहरालगत असलेल्या सिरसवाडी शिवारातील दरेगाव लघु सिंचन तलावाजवळ आयकॉन स्टील कंपनीने बेकायदेशीर विहीर खोदल्याचा प्रकार समोर आलाय. या खोदलेल्या विहीरी मुळे दोन्ही गावांचे हक्काचे पाणी संपुष्टात येत असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे पाणी टंचाईचं संकट उद्भवण्याची शक्यता निर्माण झालीय. सदरील विहीर तातडीने बंद करून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी सिरसवाडी च्या सरपंच सौ. सुमित्रा रवींद्र ढगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलीय.
आज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना दिलेल्या लेखी निवेदनात सरपंच सौ.सुमित्रा रवींद्र ढगे यांनी म्हंटलंय की, आयकॉन स्टील कंपनीने दरेगाव लघु सिंचन तलावाजवळील गट क्रं. 19 मध्ये बेकायदेशीर पणे विहीर खोदून तलावाच्या दिशेने आडवे बोअर घेतलेत. ज्यातून गावाच्या हक्काचं तलावातील पाणी संबंधित कंपनीला वापरलं जातय. त्यामुळे तलावातील पाणी पातळी खालावत चालली असून उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर बेकायदेशीर विहीर तातडीने बंद करून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी सरपंच सौ. सुमित्रा रवींद्र ढगे यांनी केलीय.




















