जालना – जिल्ह्यात रोजगार हमी योजना म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण बनलंय. त्यामुळे जालना जिल्ह्यात कामं न करता बोगस लाभार्थ्यांचा वापर करुन परस्पर बीलं काढून घेण्याचे प्रकार वाढलेत. परंतु, जालना येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाने केलेल्या कारवाईमुळे आता रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार करणार्यांचे मात्र धाबे दणानलेत.

विशेष म्हणजे या योजनेत भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या राजस्थानमधील हिरालाल भैरूलाल जाट रा. धुमडास ता.जि. भिलवाडा याला राजस्थानमधून अटक करण्यात आलीय. सन 2020 मध्ये दाखल असलेल्या गुन्हाच्या तपासात निष्पन्न झालेल्या आरोपीस जालना येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने या प्रकरणात 5 जनांना अटक करुन त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीय.
जुलै 2011 ते डिसेंबर 2013 या कालावधीत घनसावंगी पंचायत समिती अंतर्गत कुं.पिंपळगाव शिवारात रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीरींच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. या कामात संगनमत करून अप्रामाणिकपणे व कपटाने प्रत्यक्षात काम न करता कामाची नोंद हजेरी पुस्तकात घेतली आणि बनावट व खोटी पुस्तके तयार करून वेळोवेळ्या रकमा मंजुर करुन घेतल्या. असे करुन शासनाचे 9 लाख 65 हजार 952 रूपयांचं नुकसान करून स्वत:चा व इतरांचा फायदा करून घेतल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळ दि. 21 जुलै 2020 रोजी घनसावंगी पोलीस ठाण्यात कलम 13(1)(क), सह 13(2) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सह कलम 420, 467, 468, 471, 114,109, 201, 34 खझउ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील भ्रष्टाचार करणार्यामध्ये तत्कालीन शाखा अभियंता शे.शकील मो. खलील, तत्कालीन ग्रामसेवक धोंडीभाऊ भाऊराम काळे, तत्कालीन सरपंच अंशीराम भिमराव कंटुले, रोजगार सेवक पुंडलिक लक्ष्मण रोकडे, आणि राजस्थानमधून अटक केलेला हिरालाल भैरुलाल जाट यांना अटक करण्यात आलंय. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, पोलीस उप अधिक्षक किरण बिडवे यंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर, पथकातील पोलीस नाईक गजानन खरात, पोलीस काँस्टेबल गजानन कांबळे यांनी केलीय.




















