जालना – सुशिक्षित बेरोजगारांना तसेच शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या समृध्द करण्यासाठी समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांच्या प्रयत्नातून शेतमाल वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून वाहने उपलब्ध करून देण्यात येत आहे. ३५ टक्के सबसिडीवर १५ लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात गुरुवारी (दि.४) ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे युवकांना हक्काचा रोजगार मिळाला आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत मंजूर झालेल्या शेतमाल वाहतुकीच्या वाहनांचे गुरुवारी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते बाबुराव खरात यांच्या हस्ते या शेतमाल वाहतुकीच्या वाहनांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे समन्वयक आनंद बामणे, गणेश टकले, महिंद्रा बँकेचे विशाल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वाहन मिळालेल्या बेरोजगार युवक व शेतकऱ्यांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले.
घनसावंगी, अंबड व जालना तालुक्यातील बेरोजगार युवक तसेच शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घ्यावा. त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजप जनसेवा कार्यालयातून प्रयत्न करण्यात येत आहे. प्रत्येक गावात ५ वाहने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे.




















