कुंभारी (निर्मला जवळे) – सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई असली तरी नियम धाब्यावर बसवून बसस्थानक, स्नॅक सेंटर, उद्यानांमध्ये धूम्रपान केले जाते. अशावेळी धूम्रपान करणाऱ्यांपेक्षा त्यांनी सोडलेल्या धुराच्या संपर्कात येण्याच्या प्रकाराला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. अशा पॅसिव्ह स्मोकिंगमुळे कर्करोगाचा धोका बळावत असल्याचे आरोग्य संस्थांच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे धूम्रपान निर्बंधांना कोलदांडा दाखवणाऱ्यांवर कठोर करावाईची गरज आहे. आजची युवा पिढी ही देशाचे उज्वल भविष्य आहे. त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी शाळा महाविद्यालय परिसरांत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या खरेदी-विक्रीस मनाई आहे. मात्र, इतर गर्दीच्या ठिकाणी सर्रास धूम्रपान केले जाते. त्याचा त्रास गर्दीतील इतरांना सोसावा लागतो. धूम्रपानाचा त्रास हा केवळ स्वतः धूम्रपान करणाऱ्यांपुरताच मर्यादित नसून संपर्कात येणाऱ्यांनाही त्याचा त्रास होतो.

ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज, इज्युरीज अँड रिस्क फॅक्टर्स या अभ्यासातील निष्कर्षानुसार धूम्रपान करणाऱ्यालाच नव्हे तर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासातील व्यक्तीलाही कर्करोगाचा धोका बळावतो. धूम्रपानातून निघणाऱ्या धूरामध्ये शेकडो धोकादायक रसायने फुफ्फुसात जातात. त्यापैकी बहुतांश रसायने कर्करोग होण्यास कारणीभूत असतात. पॅसिव्ह स्मोकिंगबाबत द लॅन्सेट यासह विविध आरोग्य संघटनांनी केलेल्या सर्वेमध्ये कर्करोग होण्यामागे सर्वात प्रमुख १० कारणांमध्ये पॅसिव्ह स्मोकिंगचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. धूम्रपान हे केवळ शारीरिक व्याधींसाठीच नाही तर २३ प्रकारांच्या कर्करागास कारणीभूत ठरत आहे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास हानीकारक आहे. तरीदेखील तरुणाईकडून स्टाईल आणि फॅशनच्या नावाखाली बिडी, सिगारेटचा झुरका मारला जात आहे. त्यातून अनेक जीवांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे.




















