कुंभारी (निर्मला जवळे) – आरोग्य केंद्राचे कामकाज नीटपणे सुरू राहावे, यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत जनआरोग्य समिती स्थापन केली जाते पण दक्षिण तालुक्यातील काही आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या जनआरोग्य समित्यांची एकही बैठक झालेली नाही. याचा परिणाम रुग्ण सेवेवर होत असून, या समित्या फक्त कागरावरच असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून येत आहे.
आयुष्मान भारत योजने अंतर्गत गावस्तरावरील आरोग्य उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर झाले. आरोग्य सेवामधील समस्यांचे निराकरण करण्यासाठी व सक्रिय लोकसहभागास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समाजिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी स्थानिक निधीचा विकेंद्रित नियोजनात आणि ऑडिट प्रक्रियेत प्रत्यक्ष लोकसहभाग निर्माण करून कारभार पारदर्शक ठेवला जाईल, यासाठी स्थानिक पातळीवरच प्रभावी संस्थात्मक यंत्रणा म्हणून जनआरोग्य समित्या स्थापन करण्यात आल्या. पण अनेक समित्यांनी शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.

या समितीच्या वर्षाला दहा बैठका होणे बंधनकारक आहे; पण काही ठिकाणी अद्याप एकही बैठक झाली नाही. त्यामुळे आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कामकाजाचा आढावा, इमारत देखभाल दुरुस्ती, औषधे मिळालेल्या निधीचे नियोजन या सर्व गोष्टी रखडलेल्या आहेत. याचा सरळ परिणाम रुग्णांवर होत असून या समित्या स्थापन केल्याच कशासाठी, असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.
जन आरोग्य समित्या या आयुष्मान भारत कार्यक्रम व आरोग्यवर्धिनी केंद्रांचा एकमेव दुवा आहे. ही समिती रुग्ण व आरोग्य व्यवस्था यांच्यामध्ये देखरेख व नियोजनाची महत्त्वाची भूमिका पार पाडते, पण समित्यांच्या बैठका नियमित होत नसल्या कारणाने रुग्णांचे हक्क, अधिकार नाकारले जातच आहेत. परंतु आरोग्य संस्था सुद्धा सक्षम होण्यात अडथळे येत आहेत. तसेच प्रशासनास याबाबत गांभीर्य दिसत नाही, ही खेदाची बाब आहे, असे सी आर पी निर्मला जवळे यांनी सांगितले.




















