कुंभारी (निर्मला जवळे) – सिंचनासह अन्य कारणांसाठी राज्यात दरवर्षी साधारणतः दीड लाखांहून अधिक कूपनलिका खोदल्या जात आहेत, त्याशिवाय राज्यात दरवर्षी २५ हजारांवर विहिरींचीही भर पडत आहे. परिणामी, दिवसेंदिवस राज्याच्या भूपृष्ठाची जणूकाही चाळण होताना दिसत आहे. ‘ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड क्लायमेट एक्सपेरिमेंट’ या जागतिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील भूजलाच्या उपशाची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार राज्यात आजघडीला २० लाखांवर विहिरी आणि ४२ लाखाहून अधिक कूपनलिका आहेत. बहुतांश कूपनलिका या शेतीच्या सिंचनासाठी वापरात येत असल्या तरी घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी खोदाई करण्यात येत असलेल्या विहिरींची संख्याही लक्षणीय आहे.

टाटा ऊर्जा संशोधन संस्थेने केलेल्या अभ्यासातून असे निश्चित झाले आहे की, देशात वार्षिक १५,२५५ टीएमसी पाणी भूपृष्ठाखाली उपलब्ध होत असते. आज राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी १७४ तालुके हे कायमस्वरूपी दुष्काळी समजले जातात. राज्यातील हे १७४ तालुके म्हणजे जवळपास निम्मा महाराष्ट्र आज सर्वच प्रकारच्या पाणी वापराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात भूगर्भातील पाणी साठ्यावर विसंबून आहे, राज्यात दरवर्षी ७५३ टीएमसी भूगर्भातील पाण्याचा उपसा होतो, म्हणजे कोयना धरणासारखी सात धरणे भरतील एवढा पाणीसाठा महाराष्ट्र दरवर्षी भूगर्भातून उपसतो आहे आणि वर्षानुवर्षे हे प्रमाण वाढतच चालले आहे. परिणामी, कधीकाळी २०-२५ फुटांवर असणारी भूगर्भातील पाणीपातळी आज २०० ते २५० फुटांच्याही खाली गेली आहे. यंदा राज्याच्या बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्यामुळे सिंचनासह अन्य वापराच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात विहिरी आणि कूपनलिकांची खोदाई सुरू झालेली दिसत आहे. राज्यात आजघडीला २० लाखांहून अधिक विहिरी आणि ४२ लाखांहून अधिक विहिरी आहेत. त्यात दरवर्षी २५ हजारांवर विहिरी आणि १.५० लाखांच्या घरात कूपनलिकांची भर पडताना दिसत आहेत. सध्या कुणी विहीर काढावी आणि कुणी कूपनलिकांसाठी खोदाई करावी, याबाबत शासकीय पातळीवर कोणतेही निकष नसल्यामुळे प्रामुख्याने कूपनलिकांची बेसुमार वाढ होताना दिसत आहे.
राज्यातील भूजल प्रदूषित होण्याचा मोठा धोका
राज्यातील शेत जमिनीतील रासायनिक खतांचा वार्षिक वापर हा ४०लाख ३२ हजार ५००असून, वर्षानुवर्षे त्याचे प्रमाण वाढतच आहे. शेतामध्ये वापरलेल्या रासायनिक खतांचे अंश मोठ्या प्रमाणात पाझरून भूजलात मिसळताना दिसत आहे. परिणामी अनेक कुपनलिका व विहिरीचे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. नागरी वस्त्यांमधील कुपनलिकांमध्ये सांडपाणी मिसळून त्यांचे पाणी प्रदूषित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सगळे भूजलच प्रदूषित होण्याचा धोका पर्यावरण तज्ञांकडून व्यक्त होत आहे.




















