जालन्यात 134 वर्षांची परंपरा असलेल्या धुलीवंदन हत्ती रिसाला समितीच्या वतीने आज सोमवार दि. 25 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता वाजत-गाजत प्रतिकात्मक हत्तीची मिरवणूक काढून रंगपंचमी साजरी करण्यात आली. यात जालना शहरातील नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. 134 वर्षांपासून जालना शहरात धुलीवंदन हत्ती रिसाला समितीच्या वतीने धुळवड साजरी करण्याची अनोखी परंपरा आहे. या परंपरेत शहरातील वेगवेगळ्या गल्लीतून प्रतिकात्मक बनवलेल्या हत्तीवर फुलांची बरसात केली जाते. त्यानंतर हत्तीवर बसलेला राजा हा नागरीकांना प्रसाद म्हणून रेवड्या फेकत प्रसादाचं वाटप करतो.
ही मिरवणूक ज्या भागातून जाते त्या भागात मिरवणूकीनंतर कुणीही रंग खेळत नाही. ही 134 वर्षांपासून जुनी प्रथा आहे. याच परंपरेनुसार आज देखील शहरातील नागरीकांनी मिरवणुकीत सहभागी होऊन फुले, कोरडा रंग, गुलाल उधळत गाण्यांच्या तालात धुळवड साजरी केली. सोबतच राजा देत असलेल्या रेवड्याचा आनंद लुटला. आजच्या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह धुलीवंदन हत्ती रीसाला समितीच्या पदाधिकार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.