कुंभारी :- दक्षिण तालुक्यातील कुंभारी व परिसरात कारवा कांद्याचे बीज उत्पादनाचे माहेरघर समजले जाणाऱ्या पट्ट्यात मार्च महिन्यात विहिरींना तळ गाठल्यामुळे पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. कांदा बीजेचे उत्पादन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी टँकरने पाणीपुरवठा करत धडपड सुरू केली आहे.
यंदा खरीप, रब्बी कांदा पिकातून फार काही हाती न पडल्याने शेतकरी रब्बीतील कांदा काढणे झाल्यानंतर कांदा बीजेचे उत्पादन घेतात. यातून शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात.
यंदाच्या हंगामात एक दोन अपवाद वगळता पावसाचे प्रदीर्घ खंड व अपेक्षेच्या कसोटीवर पाऊस नापास झाल्याचेच चित्र आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला हवं याचं प्रबोधन मोठ्या प्रमाणात झालं आहे. मात्र, पैशांची कमतरता आहे. ज्यांच्याकडे थोडीबहुत आर्थिक सोय आहे त्यांनी अंतिम टप्प्यात आलेल्या पिकांना टँकरने पाणी देत कांदा बीज उत्पादन वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या कांदा बीजेचे उत्पादन डोळ्यासमोर वाळू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कमी पर्जन्यमानामुळे परिसरातील अनेक विहिरींनी मार्च महिन्यातच तळ गाठला. मार्च महिना सुरू असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाणीपातळी खालावल्याने सिंचनाचा बोजवारा उडाला आहे. वाढते तापमान आणि पाण्याची कमतरता यामुळे कांद्याची फुले कोमेजल्या आहेत.
कुंभारी, कर्देहल्ली, रामपूर, तोगराळी आदी गावांमधील शेतकऱ्यांनी आता तोंडाशी आलेला कांदा बीजेचे उत्पादन वाचवण्यासाठी पाण्याचे टँकर मागवून पिके वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.