जाफ्राबाद प्रतिनिधी (समाधान भोपळे) शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवारी रंगपंचमी उत्सहात साजरी करण्यात आली. सकाळपासून शहराच्या विविध भागात ‘रंग बरसे’चा उत्साह होता. यावर्षी अनेकांनी कोरड्या रंगाची उधळण करत पाणीबचतीचा पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करण्याचा संदेश देऊळझरी येथील तरुणाई ने दिला अनेकांनी सार्वजनिकपणे रंगांची उधळण केली. गावातील इतर भागातही रंगपंचमीचा जल्लोष दिसून आला. यावर्षी झालेल्या अल्प पावसामूळे पाणीटंचाईचे सावट आहे. परिणामी शहरास ग्रामीण भागात कोरड्या रंगांची उधळण करण्यात आली. मात्र, सार्वजनिक ठिकाणी झालेल्या रंगोत्सवात तरूणांनी अनेक ओल्या रंगांचा आनंद लुटला.
प्रत्येकालाच वेगवेगळ्या रंगांचे आकर्षण असते. त्यामुळे रंगांचा सण असलेली रंगपंचमी मोठ्या आनंदाने व जल्लोषात साजरी करण्यात आली. तरूणांसह महिलांनीही एकमेकांना रंग लावून आंनद साजरा केला. गावातील गल्लोगल्लीत बच्चेकंपनीसह कुटुंबीयांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग दिसून आला. आपल्या मित्र-मैत्रिणींना रंग लावण्यासाठी तरूणांचे जथ्थे गावातुन फिरत असल्याचे चित्र पाहवयास मिळाले. गावांच्या प्रमुख चौकांमध्ये रंगाची विक्री करणारे अनेक दुकाने थाटण्यात आली होती. बहुतांश लोकांनी कोरड्या रंगांना पसंती दिली. खासगी, शासकीय कार्यालयांतही रंगपंचमीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बाजारात विविध प्रकारच्या रंगांच्या पिचकाऱ्या दाखल झाल्या होत्या. तरूणांनी मनसोक्तपणे रंगांची उधळण करीत संगीताच्या तालावर ठेका धरला होता.