जाफराबाद (प्रतिनिधी) शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यावसायाकडे पाहिले जाते. असे असताना आता हा व्यवसाय करणे अवघड झाले आहे. दूध दरात मोठी घसरण झाली आहे. ३४ रुपयापर्यंत गेलेले दर आता २४ रुपयावर आले आहेत. तर दुसरीकडे चाऱ्याचे व पशुखाद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. दुधाळ जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना आता अवघड जात आहे.गेल्या तीन चार महिन्यात दूध दर प्रति लिटर सात ते आठ रुपयेने घसरले आहेत. एन.उन्हाळ्यात दूध दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांची लग्नसराई कडू होण्याची शक्यता आहे. सरकारी अध्यादेशाला दूध संघांनी केराची टोपलीत टाकून मनमानी कारभार चालू केला आहे. टप्प्याटप्प्याने दूध दरात मोठी घसरण होत चालली आहे. मे जून महिन्यात गायींच्या दूध दरात ३८ रुपयांचा उच्चांक नोंदवला होता. शासनाने अध्यादेश काढून कमीतकमी ३४ रुपये दरापेक्षा कमी दर देऊ नये, असे स्पष्ट केले होते. परंतु आता अध्यादेश काढल्यापासून दूध दरात घट होत आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यात पाच रुपयांनी दूध दर कमी झाले. एन उन्हाळ्याच्या तोंडावरच मोठी घसरण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारचे नियंत्रण नसल्यानेमुळे दूध संघांची मनमानी चालू आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आथिर्क फटका सहन करावा लागत आहे.
दुधाचे दराला शासनाने हमीभाव जाहीर केल्यामुळे पशुपालन व्यवसाय वाढविण्याच्या तयारीत होते. गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरे खरेदी केली. त्यासाठी जवळचे पैसे खर्च केलेतर काहींनी बँकेचे कर्ज घेऊन गायी, म्हशी खरेदी केल्या होत्या. मात्र, सध्या वाढलेले पशुखाद्याचे दर, चाऱ्याचे दर व दूध दरात झालेलीकपात यामुळे दूध उत्पादक शेतकरी अर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे जनावरे विकताही येईना आणि ठेवताही येईना, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली दूध दरात मोठी घसरण झाल्याने उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच पेरणीचे दिवस तोंडावर आहेत. शिवाय मशागतीचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे जाफ्राबाद तालुक्यातील शेतकरी कवडीमोल किमतीत पशुधन विकून बी- बियाणे खरेदी करताना दिसत आहेत.देऊळझरी सिपोरा. बोरगाव (बु), हनुमंतखेडा, वानखेडा, भारज देऊळगाव देवी परिसरातील पशू पालक शेतकरी दुधाला कमी भाव मिळत असल्याने हैराण झाले आहेत. पूर्वी दुधाचे दर समाधानकारक होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पशुधन वाढवून दुग्ध व्यवसायाचा मार्ग निवडला. परंतु, अचानक दुधाचे भाव गडगडले. यातच पशुखाद्याचे भाव मात्र तेजीत आहेत. पशुसंवर्धन करण्यासाठी लागणारा चारा चढ्या भावाने मिळत आहे. तर दुधाच्या पैशातून पेंड आणि भुसा हे पशुखाद्य घेणेसुद्धा अवघड झाल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून पूर्वी ४८ ते ५० रुपये लिटर प्रमाणे म्हशीचे दूध खरेदी केले जात होते. आता हेच दूध ४० ते ४५ रुपये लिटर प्रमाणे खरेदी करून त्याची विक्री ५० रुपयांप्रमाणे केली जात आहे. तर गाईच्या दुधाला केवळ २३ रुपये दर मिळत आहेत. यात शेतकऱ्यांनी कष्ट करूनही त्यांच्या हाती काहीच पडत नसल्याचे चित्र आहे.
- दुधाचे दर पडल्याने शेतीचा जोडधंदा तोट्यात आला आहे. माझ्याकडे दहा गाई आहेत. परंतु, दुधाला भाव कमी अन् गाईचे संगोपन करण्यासाठी खर्च जास्त लागत आहे. त्यामुळे गाई सांभाळताना नाकीनऊ येत आहेत. आता दूध संघाकडून दुधाला चांगला दर मिळेल, अशी आशा आहे आहे.
समाधान भोपळे
दुध उत्पादक शेतकरी