कुंभारी:- भाजपाने सोलापूर लोकसभेचा उमेदवार म्हणून माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले तर, काँग्रेसकडून सोलापूर शहर मध्यचे विद्यमान आमदार प्रणिती ताई शिंदे यांचे नाव ‘फिक्स’ आहे. लोकसभेच्या या निवडणुकीत सरळ लढत होणार की, या दोघांमध्ये तिसरा निवडणुक रिंगणात उतरणार, याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. मागील सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीचा इतिहास पाहता, एक दुसऱ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये अन्य काही उमेदवार हे निवडणुक रिंगणात उतरले होते. या राजकीय रणनितीची पुन्हा पुनरावृत्ती होते काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. कारण, काँग्रेसची ‘वोटबँक’ फोडण्याची जुनीच रणनीती भाजपाने आखली असल्याची सुत्राची माहिती आहे.
२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाकडून डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज, काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे तर बहुजन वंचित आघाडी कडून प्रकाश आंबेडकर दोघात तिसरा उमेदवार निवडणुकीत उतरल्याने काँग्रेसच्या ‘वोटबँके’ला धक्का बसून सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता, हा राजकीय ‘इतिहास’ आहे.
यंदा योगायोगाने लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचा बहुजन वंचित आघाडी महाविकास आघाडी सोबत असल्याने काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढली असे मानता येईल. तसेच भाजपसोबत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे शिवसेना एकत्र आल्याने भाजपाची सुद्धा ताकद वाढली असे म्हणता येईल. महायुतीनंतर त्यांच्या अनेक समर्थक अन् मावळ्यांनी धन्यता मानली. परंतु यात एक वर्ग असाही आहे की, ज्यांना महायुतीच्या पाऊलावर पाऊल ठेवणे पसंद पडलेले नाही. त्या वर्गाचे नाव मुस्लिम व दलित असे आहे. त्यामुळे मुस्लिम व दलित कार्यकर्ते अद्यापही काँग्रेसमध्ये कायम आहेत. ज्यांची पारंपरिक ओळख ही कॉंग्रेसची ‘वोटबँक’ अशी आहे. काँग्रेसने प्रणिती ताई शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपाने राम सातपुते यांचे नाव ‘फिक्स’ केले. प्रणिती ताई शिंदे यांच्या तोडीस तोड उमेदवार म्हणून राम सातपुते यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे काँग्रेसची ‘वोटबँक’ फोडण्याची जुनीच रणनीती भाजपा आखत असल्याची सुत्राची माहिती आहे. काँग्रेसच्या या ‘वोटबँके’ला धक्का लावण्यासाठी तिसरा सक्षम उमेदवार निवडणुक रिंगणात ‘लॉन्च’ करण्याचा भाजपाचा ‘प्लॅन’ आहे. जो की, काँग्रेसची ‘वोटबँक’ फोडू शकेल. मात्र तो उमेदवार नेमका कोण, हे कळण्यास अजून काही अवधी आहे.