जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाने शुक्रवार दि. 7 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून धरणे आंदोलन सुरु केलंय. त्यामुळे शिक्षक संघाच्या वतीने एक शिष्टमंडळ माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांना निवेदन देण्यासाठी गेलं होतं. पंरतु, शिक्षणाधिकारी यांच्या दालनात शिक्षणाधिकारी मंगल धुपे नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांनी गैरहजर असलेल्या शिक्षणाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देत आंदोलन केलं.
मागील अनेक दिवसापासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रलंबित असणारे प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली होती. त्या संदर्भात शिक्षणाधिकारी यांनी तक्रार निवारण बैठक आयोजित करण्यासाठी निवेदनही देण्यात आलं होतं. कर्मचारी यांचे वैयक्तिक प्रकरणे व सामूहिक प्रकरणा संदर्भात न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतू, संबंधित शिक्षणाधिकारी यांनी आचार संहितेचं कारण देऊन वेळकाढूपणा केला होता. संघटनामार्फत वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आलंय. यावेळी आंदोलनकर्ते शिक्षक प्रदीप विश्वनाथ राठोड, बाळासाहेब देविदास लहाने, संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, सचिव संजय येळवंते, केंद्रीय कार्यकारणी उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रेमदास राठोड, आरेफ कुरेशी, प्रा.मारुती तेगमपुरे, जगनराव वाघमोडे, प्रद्युम्न काकड, हाकीम पटेल, दिपक शेरे, नारायण मुंढे, तुकाराम पडघन, गजानन खरात, रंगनाथ सोन्नी, लंके, अचलखांब, भाबट, नाडे, शिवाजी कांयदे, भगवान पालकर, कुढे यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.