जालना शहरातील नवीन मोंढा ते वरकड हॉस्पीटल दरम्यान एका शेतकर्याला बनावट पोलीसांनी लुटल्याची घटना घडली होती. सोन्याच्या दागीन्यासह शेकर्याचा सुमारे 1 लाख 67 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपी वेगवेगळ्या ठिकाणावरुन स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याची माहिती शनिवार दि. 8 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दिली.
कडवंची येथील दिलीपराव दत्तु क्षिरसागर यांना दि.06 जून 2024 रोजी दुपारी 02.30 वाजेच्या नविन मोंढा जालना येथुन भोकरदन नाका रोड मार्गे जुना मोंढा येथे जात असतांना पोलीस असल्याचे सांगून लुटले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करुन तनवीर उर्फ छोटू आजीज आली, रा. बिदर, हल्ली मुक्काम परळी वैजनाथ आणि जाफर हबीब बेग रा. शिवाजीनगर, परळी वैजनाथ यांना नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथून पाठलाग करून ताब्यात घेतलं. त्यांच्या ताब्यातून सोन्याची साखळी, दोन सोन्याच्या अंगठ्या असा लुटलेला सोन्याचा 100% टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरील दोघेही इराणी गँग मधील असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगीतलं. यावेळी त्यांच्या ताब्यातून एक चोरीची मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि. योगेश उबाळे, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, रामप्रसाद पव्हरे, प्रशांत लोखंडे, सचिन चौधरी, योगेश सहाणे, सौरभ मुळे यांनी केलीय




















