छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री जामखेडनजीक अटक केली. त्यानंतर खांडेंची पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाच्या जिल्हा प्रमुखावर केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. मात्र, या कारवाईला शिंदे गटातीलच दोन नेत्यांमधील अंतर्गत वादाची पार्श्वभूमी आहे. दरम्यान या अटकेपाठोपाठ शिवसेनेने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे.
शिंदे गटाचे विद्यमान उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर म्हाळज जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल विरोधात टाकल्यावरून प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कुंडलिक खांडे, त्यांचे बंधू आदी १२ जणांविरुद्ध एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या पार्श्वभूमीवर कुंडलिक खांडेंची अटक असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. कुंडलिक खांडे यांच्याविरुद्ध नुकतेच बीड व परळी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु त्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी लोकसभा निवडणुकीशीही संदर्भातील आहे. पंकजा मुंडेंऐवजी आपण बजरंग सोनवणे यांच्यासाठी निवडणुकीत काम केले. पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला, अशा संभाषणाची एक कथित ध्वनिफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होण्यापूर्वीच्या कालावधीतील ही ध्वनिफीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर खांडे यांचे बीडमधील संपर्क कार्यालय काही अज्ञातांनी फोडले. तर परळी पोलीस ठाण्यात वाल्मीक कराड यांच्या फिर्यादीवरून कुंडलिक खांडेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन गुन्ह्यांप्रकरणात कुंडलिक खांडे चर्चेत आले असतानाच एप्रिल महिन्यातील त्यांच्या पक्षातील पदाधिकारी व अलीकडेच उपजिल्हा प्रमुखपद मिळालेले ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.