जालना शहरातील वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात सातत्याने वाढ होत आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने वीज वितरण कंपनीने तात्काळ पाऊलं उचलावीत नसता कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालण्यात येईल असा स्पष्ट इशारा भाजपाचे जालना महानगर अध्यक्ष अशोक पांगारकर यांनी बुधवार दि. 3 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता दिलाय.
जालना शहरातील विविध भागात मागील काही महिन्यांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली. कधी दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीज पुरवठा बंद केला जातो.. वीज वितरण कंपनीच्या या बेजबाबदार कारभारामुळे शहरातील सर्वच भागातील जनता त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. सर्व सामान्य जनतेच्या तक्रारीची कोणतीही दखल वीज कंपनीचे अभियंते अथवा कर्मचार्यांकडून घेतली जात नाही. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपा जालना महानगर अध्यक्ष अशोक पांगारकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याची भेट घेतली. यावेळी भीम उद्योग अभियानचे संजय इंगळे यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते. दररोज दिवसभरात किमान चार ते पाच वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने सर्व सामान्य जनता, छोटे, मोठे व्यावसायिक त्रस्त झालेत. या प्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने तात्काळ पाऊल उचलावे अशी मागणी करण्यात आली. येत्या आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर, वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता वानखेडे, मोरे आदींची उपस्थिती होती.